मराठवाड्याच्या पाण्यावर दरोडा

By Admin | Published: May 11, 2014 11:04 PM2014-05-11T23:04:29+5:302014-05-12T00:12:35+5:30

विजय गायकवाड , नांदूर मधमेश्वर जलदगती कालव्याद्वारे सोडण्यात येणार्‍या पाण्यातून एक हजार ५४ दशलक्ष घनफूट (१.२ टीएमसी) कपात करण्याचा निर्णय घेतल्याने लाभधारक शेतकर्‍यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

Rampage on Marathwada water | मराठवाड्याच्या पाण्यावर दरोडा

मराठवाड्याच्या पाण्यावर दरोडा

googlenewsNext

विजय गायकवाड , वैजापूर नाशिक पाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांनी मराठवाड्याच्या पाण्यावर दरोडा घालून वैजापूर-गंगापूर तालुक्यासाठी नांदूर मधमेश्वर जलदगती कालव्याद्वारे सोडण्यात येणार्‍या पाण्यातून एक हजार ५४ दशलक्ष घनफूट (१.२ टीएमसी) कपात करण्याचा निर्णय घेतल्याने दोन्ही तालुक्यांतील लाभधारक शेतकर्‍यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. याचा फटका तालुक्यातील जवळपास ३० गावांना बसणार आहे. नाशिक पाटबंधारे विभागाने दारणा समूहातून नांदूर मधमेश्वर कालव्याद्वारे वैजापूर व गंगापूर तालुक्यांसाठी २५ एप्रिल रोजी उन्हाळी आवर्तन सोडले होते. २८ एप्रिलला आवर्तन वैजापूर तालुक्यात पोहोचले. गंगापूर तालुक्यासाठी प्रथम प्राधान्य देण्यात आले होते. नांमकाच्या लाभक्षेत्रात वैजापूर तालुक्यातील ६० व गंगापूर तालुक्यातील ४० गावे येतात. गंगापूर तालुक्यातील शेतकर्‍यांना पाणी मिळाल्यानंतर वैजापूर तालुक्यात पाणी सोडण्याचे नियोजन नांमका विभागाने केले होते. तालुक्यातील जवळपास ३० गावांना पाणी पोहोचले होते; परंतु नाशिक पाटबंधारे विभागाने शुक्रवारी पाणी अचानक बंद केले. नाशिक पाटबंधारे विभागाच्या या तुघलकी कारभारामुळे तालुक्यात पाणीवाटपाचे नियोजन कोलमडल्याचे नांमकाचे कार्यकारी अभियंता आर. पी. फुलंब्रीकर यांनी सांगितले. या आवर्तनातून वैजापूर व गंगापूर तालुक्यांना एक हजार ७२८ दशलक्ष घनफूट पाणी मिळणे अपेक्षित होते; परंतु १२ दिवस पाणी सोडल्यानंतर नाशिक पाटबंधारे विभागाने दारणा समूहातील प्रकल्पांचे पाणी नाशिक जिल्ह्याला पिण्यास पुरवण्यासाठी सुधारित देय कोट्यानुसार कालव्यासाठी केवळ ५०५ दशलक्ष घनफूट पाणी शिल्लक असल्याचा संदेश पाच मे रोजी नांमका विभागाला पाठवला व चार दिवसांनी पाणी बंद केले. पाण्यावरून आता नाशिक विरुद्ध औरंगाबाद असा मोठा संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत. १०५४ दशलक्ष घनफूट पाणी पळविले मराठवाडा गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांनी ३ डिसेंबर रोजी घेतलेल्या बैठकीत नांदूर मधमेश्वर जलद कालव्याच्या मुखाशी एकूण ४ हजार ३१८ दशलक्ष घनफूट पाणी उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले होते. आतापर्यंत नांमकाद्वारे सोडलेल्या आवर्तनातून २५९० दशलक्ष घनफूट पाणी मिळाले. तिसर्‍या आवर्तनातून १७२८ दशलक्ष घनफूट पाणी मिळणे अपेक्षित होते; परंतु १२ दिवसांतच आवर्तन अचानक बंद करण्यात आले. तिसर्‍या आवर्तनात फक्त ६७४ दशलक्ष घनफूट पाणी मिळाले. म्हणजेच या आवर्तनाचे १०५४ दशलक्ष घनफूट पाणी नाशिक पाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांनी पळविले.

Web Title: Rampage on Marathwada water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.