“‘या’ मतदारसंघातून लोकसभा लढवण्यास तयार, शरद पवारांचा निर्णय अंतिम”; रामराजे थेट बोलले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2023 11:46 AM2023-05-12T11:46:24+5:302023-05-12T11:47:07+5:30
Ramraje Naik Nimbalkar: रामराजे नाईक निंबाळकर यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत महत्त्वाचे विधान केले.
Ramraje Naik Nimbalkar: २०२४ ला होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बहुतांश पक्षांकडून तयारीला सुरुवात झाल्याचे पाहायला मिळत आहे. यामध्ये भारतीय जनता पक्ष आघाडीवर आहे. त्यादृष्टीने रणनीती आखायला सुरुवात झाल्याचे सांगितले जात आहे. यातच आता ठराविक मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा बोलून दाखवली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी लोकसभा लढवण्याची इच्छा व्यक्त केली असून, मतदारसंघाबाबतही भाष्य केले आहे.
रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त अलीकडेच झालेल्या अभीष्टचिंतन सोहळ्यात विरोधी पक्षनेते अजित पवार व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी रामराजेंना दिल्लीत पाठवण्याची गरज आहे, त्यासाठी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पुढे हा विषय मांडून मान्य करून घेतला जाईल, असे जाहीर केले होते. त्यानंतर आता लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत रामराजे नाईक निंबाळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शरद पवारांचा निर्णय अंतिम
सातारा जिल्हा बँकेच्या नफ्यातून शेतकऱ्यांसाठी विविध तरतुदी करण्यासाठी संचालक मंडळाची बैठक झाली. या बैठकीनंतर रामराजे यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी बोलताना, पक्षाने आदेश दिला तर मी माढा लोकसभेची निवडणूक लढण्यास तयार आहे. त्यासाठी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवारांचा निर्णय अंतिम असेल; पण माढ्याचा खासदार यावेळेस फलटणच्या वाड्यातीलच होईल. वाड्याबाहेरचा खासदार होणार नाही, असे रामराजे यांनी स्पष्टपणे सांगितले. या विधानातून भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना अप्रत्यक्ष आव्हानच दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीकडून माढा लोकसभेसाठी रामराजेंचे नाव निश्चित असल्याची चर्चा सुरू झाली आहे. रामराजेंची भूमिका महत्त्वाची होती. ते या निर्णयाला मान्यता देणार का?, तसेच शरद पवारांचा दुजोरा मिळणार का?, असे काही प्रश्न राजकीय वर्तुळातून उपस्थित होऊ लागले आहेत.