रामतीर्थावर आज अखेरची शाहीपर्वणी
By admin | Published: September 18, 2015 04:10 AM2015-09-18T04:10:23+5:302015-09-18T04:10:23+5:30
सप्तर्षींचे स्मरण करत भाद्रपद शुद्ध पंचमी अर्थात ऋषिपंचमीच्या मुहूर्तावर रामघाटावरील गोदावरीत साधू-महंतांसह लाखो भाविक शुक्रवारी डुबकी घेतील आणि सिंहस्थ कुंभमेळ्यातील नाशिकमधील
नाशिक : सप्तर्षींचे स्मरण करत भाद्रपद शुद्ध पंचमी अर्थात ऋषिपंचमीच्या मुहूर्तावर रामघाटावरील गोदावरीत साधू-महंतांसह लाखो भाविक शुक्रवारी डुबकी घेतील आणि सिंहस्थ कुंभमेळ्यातील नाशिकमधील तीनही शाही पर्वणींचा अध्याय सुफळ संपूर्ण होईल. नाशिकमध्ये होणाऱ्या तिसऱ्या आणि अखेरच्या शाहीपर्वणीनिमित्त जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून, महापर्वणीप्रमाणेच बंदोबस्ताचे नियोजन ‘जैसे-थे’ राहणार आहे.
नाशिक व त्र्यंबकेश्वर याठिकाणी पहिली पर्वणी २९ आॅगस्टला, तर द्वितीय महापर्वणी १३ सप्टेंबरला निर्विघ्न पार पडली. आता नाशिकला वैष्णव पंथियांची अखेरची व तिसरी पर्वणी शुक्रवारी होत असून, त्र्यंबकेश्वर येथील शैव पंथियांची अखेरची पर्वणी २५ सप्टेंबरला पार पडणार आहे.
तिसऱ्या पर्वणीलाही तपोवनातील साधुग्राममधून लक्ष्मीनारायण मंदिरापासून तीनही प्रमुख आखाडे व खालशांची ब्रह्म मुहूर्तावर शाही मिरवणूक निघेल. या मिरवणुकीत द्वितीय पर्वणीप्रमाणेच आखाड्यांचा क्रम राहील. मिरवणुकीच्या अग्रभागी निर्मोही आखाडा राहणार असून, मधोमध नेहमीप्रमाणे दिगंबर आखाडा चालणार आहे. सर्वांत शेवटी निर्वाणी आखाडा रामकुंडाकडे प्रस्थान करेल.
महिलांची गर्दी वाढण्याची शक्यता
भाद्रपद शुक्ल पंचमी अर्थात ऋषिपंचमीला सप्तर्षींचे पूजन केले जाते. प्रामुख्याने महिलांकडून पापक्षालनासाठी ऋषिपंचमीचे व्रत केले जाते. त्यामुळे शुक्रवारी ऋषिपंचमीला महिलांची रामघाटावर मोठी गर्दी उसळण्याची शक्यता आहे.
रिते होऊ लागले साधुग्राम
सिंहस्थ कुंभमेळ्याची धर्मध्वजा १४ जुलैला फडकल्यानंतर तपोवनातील सुमारे ३३५ एकर जागेत साधुग्राममध्ये प्रमुख तीन आखाड्यांसह त्यांच्या आठशेहून अधिक खालशांचा मुक्काम आहे. शुक्रवारी शेवटची शाहीपर्वणी असल्याने साधुग्राम परिसरात साधू-महंतांनाही आता परतीचे वेध लागले आहेत. अनेक खालसे व धार्मिक संस्थांनी, तर तिसऱ्या पर्वणीपूर्वीच साधुग्राम खाली केले आहे. साधुग्राममधील भाविकांचीही वर्दळ आता बऱ्यापैकी कमी झाली असून, अखेरची पर्वणी आटोपल्यानंतर साधुग्राम रिते व्हायला सुरुवात होईल.