रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2024 04:40 PM2024-11-08T16:40:18+5:302024-11-08T16:42:38+5:30

Maharashtra Assembly Election 2024: रामटेक विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवारांमुळे महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार डेंजर झोनमध्ये येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

Ramtek Assembly Election 2024 Analysis : Mahayuti Mahavikas Aghadi candidates are in danger zone due to independent candidates. | रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!

रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!

जितेंद्र ढवळे, नागपूर 
Ramtek Assembly election 2024 Explained: संकटाच्या मालिका पार करीत लोकसभेत काँग्रेसने रामटेकचा गड सर केला. मात्र १७ उमेदवार रिंगणात असलेल्या रामटेक विधानसभेत काँग्रेस बंडखोर राजेंद्र मुळक, चंद्रपाल चौकसे आणि सचिन किरपान हे तीन अपक्ष उमेदवार कुणाचा घात करणार, यावरून गावागावांतील राजकीय पारा तापला आहे.

रामटेकमध्ये सध्या चौरंगी लढत होताना दिसतेय. याचा फटका महायुतीचे (शिंदेंची शिवसेना) आशिष जयस्वाल आणि महाविकास आघाडीचे (ठाकरे शिवसेना) विशाल बरबटे यांना बसेल की, याहीवेळी अपक्षच गड सर करणार, यावरून राजकीय तर्कवितर्कही लढविले जात आहेत. मात्र प्रचाराच्या प्रारंभी अपक्षांनीही आघाडी घेतली असल्याचे चित्र आहे.

रामटेकमध्ये बंडखोरी कळीचा मुद्दा

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आशिष जयस्वाल अस्तित्वासाठी लढत असताना भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी रामटेक सोडून दुसऱ्या मतदारसंघाकडे मोर्चा वळविला आहे. भूमिपुत्राच्या अस्तित्वाची लढाई असल्याचे सांगत युवकांची टीम घेऊन चंद्रपाल चौकसे गावागावांत पोहोचत आहेत. 

राजेंद्र मुळक रामटेकमध्ये विकासाच्या दिवाळीचा नारा देत आहेत. वंचित आघाडीने चंद्रपाल चौकसे यांना पाठिंबा दिला असून प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी प्रचार यंत्रणा राबविण्याचे आदेश पदाधिकारी, कार्यकर्त्यांना दिले आहेत. 

याशिवाय ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉकचे डॉ. गोवर्धन सोमदेवे, हिंदुस्थान जनता पार्टीचे पंकज मासुरकर, भीमसेनेचे प्रदीप साळवे, राष्ट्रीय गोंडवाना पार्टीचे राजेंद्र बावनकुळे, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे विशेष वसंता फुटाणे यांच्यासह आठ अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत.

आधी काय झाले आणि आता...

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने आशिष जयस्वाल यांना उमेदवारी दिल्यानंतर भाजप पदाधिकाऱ्यांनी विरोध केला. माजी आमदार डी. एम. रेड्डी यांना पक्षातून निलंबित करण्यात आले तर भाजप बंडखोर डॉ. राजेश ठाकरे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला.

महाविकास आघाडीत ही जागा उद्धवसेनेला सुटू नये यासाठी काँग्रेसचे नेते आक्रमक होते. शेवटच्या क्षणी मुळक यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला.

Web Title: Ramtek Assembly Election 2024 Analysis : Mahayuti Mahavikas Aghadi candidates are in danger zone due to independent candidates.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.