विरोधकांकडे ना बॉलर, ना बॅट्समन, ते सगळेच राखीव खेळाडू; CM एकनाथ शिंदेंचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2024 02:13 PM2024-04-17T14:13:53+5:302024-04-17T14:15:03+5:30
परदेशात जाऊन देशाची बदनामी करणाऱ्यांना मतदान करणार की अविरत देशसेवा करणाऱ्या नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करणार, हा विचार मतदारांनी करायचा आहे असं आवाहन एकनाथ शिंदेंनी केले.
सावनेर - Eknath Shinde on INDIA Allaince ( Marathi News ) विरोधी पक्षांची आघाडी मोदी व्देषाने पीडित आहे. मोदींना हरवायचे असा त्यांनी पण केलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विकेट काढणे साधी गोष्ट नाही. विरोधकांकड़े ना बॉलर आहेत ना बॅट्समन जे आहेत ते सगळे राखीव खेळाडू, अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षांवर केली.
सावनेर येथे महायुतीचे उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेमध्ये मुख्यमंत्री बोलत होते. मागील १० वर्ष आपण मोदींची बॅटींग पाहिली. त्यांनी देशाचा विकास केला. आता पुढची पाच वर्ष पंतप्रधान मोदी चौकार, षटकार मारुन विरोधकांना झोडपल्याशिवाय राहणार नाही,मोदींसाठी नेशन फर्स्ट हा अजेंडा आहे. विरोधकांकेड झेंडा नाही आणि अजेंडा नाही. विरोधक कमिशन, करप्शन फर्स्टसाठी काम करतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १० वर्षात केलेले काम आणि काँग्रेसने ५० ते ६० वर्षांत केलेले काम जनतेसमोर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्म राजनितीसाठी नाही तर राष्ट्रनितीसाठी झालाय. त्यांनी संपूर्ण जीवन देशासाठी समर्पित केलंय असं मुख्यमंत्री शिंदेंनी म्हटलं.
तसेच परदेशात जाऊन देशाची बदनामी करणाऱ्यांना मतदान करणार की अविरत देशसेवा करणाऱ्या नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करणार, हा विचार मतदारांनी करायचा आहे. विरोधकांकडे अहंकार आहे. मोदींकडे आत्मविश्वास आहे. अहकांर विनाशाकडे नेतो तर आत्मविश्वास विजयाकडे नेतो. देशात राममंदिर उभे राहिले. सरकारने हिंमत दाखवून ३७० कलम हटवले. देशातील प्रत्येक नागरिकाला प्रगतीकडे नेण्याचा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखवला आहे. महायुतीला मत म्हणजे देशाच्या प्रगतीला मत. रामटेक पूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. मात्र १९९६ साली हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची सभा झाली आणि तेव्हापासून रामटेकवर भगवा फडकत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
दरम्यान, प्रभू रामाची निशाणी धनुष्यबाण आणि महायुतीची निशाणी धनुष्यबाण आहे. काहीजण राम राम करतात मात्र त्यांची अवस्था म्हणजे मुहं मे राम बगल में छुरी अशी आहे. शिवसेना नेते खासदार कृपाल तुमाने यांचा योग्य तो सन्मान राखला जाईल असंही यावेळी एकनाथ शिंदेंनी ग्वाही दिली.
निवडणुकीत इंडिया आघाडी नावाच्या राक्षसाचा नाश करा
रामटेकमध्ये प्रभू रामचंद्रांनी चार महिने वास्तव्य केले होते. या काळात ऋषीमुनींना त्रास देणाऱ्या राक्षसांचा प्रभूंनी नाश केला होता. आताही तशीच वेळ आली आहे. येत्या निवडणुकीत इंडिया आघाडी नावाच्या राक्षसाचा नाश करा, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मतदारांना केले.