राणा दांपत्याला हवंय युतीचं सरकार ?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2019 05:52 PM2019-11-18T17:52:14+5:302019-11-18T19:30:46+5:30
आधी पती रवी राणा आणि आता खासदार नवनीत राणा देखील युती सरकारसाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. त्यांच्या या भूमिकेचे कारण काय, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
मुंबई - अपक्ष आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा देत भाजपच्या बाजुने बोलण्यास सुरुवात केली होती. आता त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर खासदार झालेल्या नवनीत राणा यांना देखील राज्यात युतीचं सरकार हवंय का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
आमदार रवी राणा निवडणुकीचा निकाल लागल्यापासूनच भाजपशी जवळीक साधत आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान करावे, यासाठी ते प्रयत्नशील आहेत. त्यातच त्यांनी शिवसेनेचे 20 ते 25 आमदार मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात असल्याचे म्हटले होते. मात्र भाजपच सत्तेपासून दूर राहणार यामुळे राणा यांची गोची झाली आहे.
दरम्यान शिवसेनेच्या समसमान वाटपाच्या मागणीमुळे युती फिस्कटली असून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेना असं सरकार सत्तेत येण्याची शक्यता आहे. यामुळेच राज्यात वेळेत सरकार स्थापन होऊ शकले नाही. त्यामुळे राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. अतिवृष्टीमुळे राज्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची गरज आहे.
अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी राज्यातील राष्ट्रपती राजवटीसाठी शिवसेनेला जबाबदार धरले आहे. शिवसेनेच्या भूमिकेमुळे राज्यात युतीचे सरकार स्थापन होऊ शकले नाही. परिणामी शेतकऱ्यांना मदत पोहोचविण्यास उशीर होत असल्याचं त्यांनी म्हटले आहे. राणा यांच्या युती सरकारसाठीच्या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. आधी पती रवी राणा आणि आता खासदार नवनीत राणा देखील युती सरकारसाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. त्यांच्या या भूमिकेचे कारण काय, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.