दारूविक्री बंदीसाठी महिला बनल्या रणरागिणी

By admin | Published: September 22, 2016 08:35 PM2016-09-22T20:35:14+5:302016-09-22T20:35:14+5:30

पोलिसांना वारंवार कल्पना देऊनही निंबूत लक्ष्मीनगर परिसरात सुरू असलेली गावठी दारूची विक्री बंद करण्यासाठी महिला रणरागिणी बनल्या

Ranaragini becomes woman for liquor ban | दारूविक्री बंदीसाठी महिला बनल्या रणरागिणी

दारूविक्री बंदीसाठी महिला बनल्या रणरागिणी

Next

ऑनलाइन लोकमत

सोमेश्वरनगर, दि. २२ : पोलिसांना वारंवार कल्पना देऊनही निंबूत लक्ष्मीनगर परिसरात सुरू असलेली गावठी दारूची विक्री बंद करण्यासाठी महिला रणरागिणी बनल्या. महिलांनी गावठी दारूची भट्टीच उद्ध्वस्त करून टाकली.
निंबूत अंतर्गत येणाऱ्या लक्ष्मीनगर येथे राजरोसपणे हातभट्टी दारू तयार करण्यात येते. वस्तीतच खुलेआम घरात ही विषारी दारूची विक्री केली जात आहे. वस्तीतील कोवळ्या वयातील मुले दारूच्या व्यसनात बुडाले आहेत. काल बुधवारी येथील महिलांनी सोमेश्वरनगर पोलीस ठाण्यात एक निवेदन दिले. त्यामध्ये वस्तीतील दारूभट्टी व विक्री त्वरित बंद करून टाकावी अशी मागणी केली. मात्र, आज गुरुवारी सकाळी पुन्हा दारूविक्री केली जात असल्याचे चित्र दिसून आले. त्यामुळे पंचवीस ते तीस महिलांनी एकत्र येऊन थेट ओढ्यातील दारूभट्टी उद्ध्वस्त केली. काल बुधवारी सकाळी लक्ष्मीनगर वस्तीतील एकतीस वर्षीय युवक विषारी दारू प्याल्याने अत्यवस्थ झाला.

त्याला नीरा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या पत्नीसह वीस ते पंचवीस महिला संतप्त झाल्या. त्यांनी थेट सोमेश्वरनगर पोलीस ठाणे गाठले. लेखी निवेदनही दिले. हा वस्तीतील अवैध दारूधंदा बंद करून शांतता निर्माण करण्याची मागणी केली होती. या वेळी मनीषा विजय पवार, जयश्री राजू परखंदे, बेबी काळू शिंदे, सविता राजू जाधव, पूजा राजू बामणे, बेबी शेखर पवार, शोभा महेश जाधव, शालन भानुदास पवार यांसह अनेक महिला उपस्थित होत्या.

नीरा-बारामती मार्गापासून दोनशे मीटर अंतरावर ओढ्यातील काटेरी झुडपात दारूभट्टी दिसून आली. तेथे तीन लोखंडी बॅरलमध्ये रसायनमिश्रित द्रव पदार्थाने भरले होते. ही दारुभट्टी दिसताच उत्स्फूर्त महिलांनी मिश्रणाचे ड्रम ढकलून दिले. हातात मिळेल त्या दांडक्याने ड्रम व इतर साहित्यांची तोडफोड केली. मागील सहा महिन्यात या वसाहतीतील पाच युवकांना विषारी दारूच्या सवयीमुळे जीव गमवावा लागल्याचा आरोप महिलांनी केला आहे. हे युवक अवघ्या अठरा ते बावीस वयोगटातील होते. तर आजही दहा युवक या विषारी दारूपायी प्रकृती खालावल्याने मृत्यूच्या दाढेत असल्याचे जयश्री परखंदे यांनी सांगितले.

रोजंदारीवर उपजीविका करून घर प्रपंचाचा गाडा ओढत आहेत. मात्र, या विषारी दारूमुळे संसार उद्ध्वस्त होत चालला आहे. त्यामुळे आता वेळ आली आहे की हा अवैध दारुधंदा उद्ध्वस्त करून वस्तीत शांतता निर्माण करण्याची; अशी प्रतिक्रिय मनिषा पवार या महिलेने व्यक्त केली आहे.

Web Title: Ranaragini becomes woman for liquor ban

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.