दारूबंदीसाठी रणरागिणी सरसावल्या !
By Admin | Published: November 1, 2016 06:11 PM2016-11-01T18:11:57+5:302016-11-01T18:11:57+5:30
दारूच्या वाढत्या व्यसनामुळे अनेकांचे संसार रस्त्यावर आले असून यापुढे गावातून दारू कायमची हद्दपार करण्याचा निर्धार खामगाव तालुक्यातील आसा (दुधा)
>ऑनलाइन लोकमत
खामगाव, (जि.बुलडाणा), दि. 01 - दारूच्या वाढत्या व्यसनामुळे अनेकांचे संसार रस्त्यावर आले असून यापुढे गावातून दारू कायमची हद्दपार करण्याचा निर्धार खामगाव तालुक्यातील आसा (दुधा) या गावातील महिलांनी केला. गावातील अवैधरित्या चालणाºया हातभट्टया उध्वस्त करून दारू विक्रेत्यांना पोलिसांच्या स्वाधीन केले. यामुळे आसा गावात दारूबंदीची पहाट उगवलेली आहे.
खामगाव तालुक्यातील आसा (दुधा) हे १४०० लोकसंख्या वस्तीचे गाव. गावात अनेक वर्षापासून हातभट्टीची दारू विक्री सुरू आहे. पोलिसांची नाममात्र कारवाई होते. परत दारू विक्रेते जैसे थे सक्रीय राहतात. छोट्याशा गावात ५० डबे हातभट्टीची दारू निघते हे विशेष. दारूच्या वाढत्या व्यसनामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. दारूमुळे गावात भांडणतंटे नेहमीच उद्भवत असून दारूकडे युवक वर्गाचा मोठ्या प्रमाणात कल वाढला आहे. तरूण पिढीला व्यसनाच्या आहारी गेल्याने गावकरी चिंतीत झाले. लग्न समारंभ, सार्वजनिक कार्यक्रमात दारूड्यांचा नेहमीचाच त्रास यामुळे नागरीक वैतागले. दारूड्यांचा घरी महिलांना विशेष त्रास सहन करावा लागतो. तेव्हा गावातुनच कायमची दारूविक्री बंद करण्यासाठी हिरकणी महिला मंडळाच्या सदस्य, सरपंच, पोलीस पाटील, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस मित्र मंडळ तसेच नागरीक यांनी एकत्र येवून निर्धार केला. हिवरखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अढाव यांना दारूबंदीची माहिती दिली. त्यांनी लगेच होकार देत गावकºयांना पुर्णत: सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
२८ आॅक्टोबर रोजी १०० महिला दारूबंदीसाठी रस्त्यावर आल्या. गावात तसेच शेतात चालणाºया हातभट्टयावर पोलिसांच्या सहकार्याने धाडी टाकल्या. सुमारे ५२ हातभट्टीचे डबे व दारूचे साहित्य उध्वस्त केले. तसेच दारू काढणाºयांना पोलिसांच्या स्वाधीन केले. यापुढे गावात दारूविक्री होवू द्यायची नाही असा संकल्प गावकºयांनी केला. सरपंच मंगला रामदास गवई, पोलीस पाटील विजय पाटील, ग्रा.पं. सदस्य कपील बारगळ, रामदास गवई, हिरकणी महिला मंडळाच्या अध्यक्षा मिनाबाई हिवराळे, सुशिला गवई, बेबीताई तिडके, शिलाबाई इंगळे, प्रभाबाई गवई, प्रभाबाई हेलोडे, संगीता गवई, सुनिल गवई यांच्यासह शेकडो महिलांनी पुढाकार घेवून गावातून दारू विक्री हद्दपार केली आहे.