राणेंच्या भाजपा प्रवेशात अडथळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2017 01:54 AM2017-04-14T01:54:49+5:302017-04-14T01:54:49+5:30

माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांच्या भाजपा प्रवेशाची जोरदार चर्चा सुरू असली तरी त्यांचा पक्षप्रवेश सहजासहजी होण्याची शक्यता नाही.

Rana's BJP entry barriers | राणेंच्या भाजपा प्रवेशात अडथळे

राणेंच्या भाजपा प्रवेशात अडथळे

Next

- यदु जोशी,  मुंबई
माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांच्या भाजपा प्रवेशाची जोरदार चर्चा सुरू असली तरी त्यांचा पक्षप्रवेश सहजासहजी होण्याची शक्यता नाही. त्यांच्या भाजपा प्रवेशात अनेक अडथळेदेखील आहेत.
राणे यांना भाजपात घेण्यासंदर्भात रा.स्व. संघाकडून अद्याप हिरवा कंदील मिळालेला नाही. राणे यांनी आतापर्यंत सातत्याने भाजपा, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संघावर टीका केली आहे. शिवसेनेत असताना त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याविरुद्ध बंड केले होते. काँग्रेसमध्ये त्यांनी आतापर्यंत पक्षातील अनेक नेत्यांवर जाहीर टीकाही केली आहे. हा अनुभव लक्षात घेता ते भाजपात आल्यानंतर भाजपाच्याच नेतृत्वावर टीका करणार नाहीत याची हमी काय, असा सवालही संघ वर्तुळात केला जात आहे.
राणे आणि भाजपाचे दिग्गज नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. तथापि, राणेंना भाजपात आणायचेच यासाठी गडकरी यांनी आपले वजन अद्याप वापरलेले नाही. पक्ष नेतृत्व, प्रदेश भाजपा आणि मुख्यमंत्र्यांनी निर्णय घ्यावा, अशी भूमिका त्यांनी घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. महाराष्ट्राबाबत राजकीय निर्णयाचा विषय येतो तेव्हा गडकरी हे फडणवीस यांचे मत अंतिम असेल अशी भूमिका घेतात असा अनुभव याआधीही आलेला आहे.
राणे यांचे गडकरींइतके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सख्य नाही. राणे विरोधी पक्षात असताना फडणवीस यांच्याशी त्यांचे स्नेहपूर्ण संबंध होते. तथापि, ते काँग्रेसमध्ये गेल्यानंतर राजकीय विरोधक म्हणूनच मुख्यमंत्री त्यांच्याकडे पाहत आले आहेत. राजकीय मतभेदांपलीकडे जाऊन विविध पक्षांतील नेत्यांशी जिव्हाळा जपण्याची गडकरी यांची शैली आहे. तथापि, फडणवीस हे कधीही ‘पार्टी लाइन’ पलीकडे जात नाहीत. ते विरोधी पक्षात असताना शेवटची जवळपास पाच वर्षे कोणत्याही मंत्र्यांच्या दालनात जाऊन भेटत नसत. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्यांना भाजपात आणून डोकेदुखी वाढविण्यापेक्षा आपापल्या भागात प्रभाव असलेल्या लहान नेत्यांना भाजपात आणण्यावर तीन वर्षांत फडणवीस यांनी भर दिला आहे. राणे हे त्यादृष्टीने पहिलेच अपवाद आहेत. ‘आपल्याला मुख्यमंत्री पदाचे आश्वासन दिले होते पण ते काँग्रेस पक्षाने पाळले नाही,’ अशी नाराजी स्वत: राणे यांनी मुख्यमंत्रीपद न मिळाल्याने व्यक्त केली होती. आता भाजपात येण्यासाठी ते काही अटी टाकतील आणि पुढे त्याची अंमलबजावणी झाली नाही, तर भाजपा नेतृत्वाबाबतही नाराजी व्यक्त करतील हा धोका लक्षात घेऊनच ‘विनाअट पक्षात आल्यास तुमचे स्वागत करू,’ असे भाजपाकडून त्यांना सांगण्यात आल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

संघ वर्तुळात काही आक्षेप
राणे यांचे पुत्र आमदार नितेश आणि माजी खासदार नीलेश यांच्या संदर्भातही भाजपा आणि विशेषत: संघ वर्तुळात काही आक्षेप आहेत.
उद्या राणेंच्या भाजपा प्रवेशाचा निर्णय झालाच हे आक्षेप आणि ते दूर करण्याची हमी त्यांच्याकडून घेतली जाईल, असेही मानले जाते.

Web Title: Rana's BJP entry barriers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.