राणेंचा राजकीय भूकंप!
By admin | Published: July 18, 2014 03:14 AM2014-07-18T03:14:11+5:302014-07-18T03:14:11+5:30
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि उद्योगमंत्री नारायण राणे राजकीय भूकंप घडविण्याच्या तयारीत आहेत.
मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि उद्योगमंत्री नारायण राणे राजकीय भूकंप घडविण्याच्या तयारीत आहेत. सोमवारी ते मंत्रिपदाचा राजीनामा देणार असून, त्याच दिवशी पुढील भूमिका जाहीर करणार आहेत. राणेंच्या या निर्णयाने राजकीय खळबळ उडाली असून, ते भाजपामध्ये जाणार की स्वतंत्र पक्ष काढणार याबाबत उलटसुलट चर्चा आहे.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक असे प्रमुख नेते मुंबईबाहेर असताना राणे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची घोषणा करून खळबळ उडवून दिली. ते म्हणाले, आज काँग्रेसमध्ये आहे. पुढे काय ते सोमवारी जाहीर करीन. राणे उद्यापासून रायगडमार्गे रत्नागिरी, सिंधुदुर्गच्या दौऱ्यावर जात आहेत. रविवारी त्यांच्या समर्थकांचा स्नेहमेळावा कणकवलीत होणार आहे. तिथे कदाचित ते आपली भूमिका मांडतील. राणे विधानसभेची आगामी निवडणूक लढणार नाहीत. यासंबंधीचा निर्णयही ते जाहीर करतील, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.