आमदार फोडण्याच्या अटीवर राणेंना मंत्रीपदाची आॅफर!
By admin | Published: April 14, 2017 05:26 AM2017-04-14T05:26:21+5:302017-04-14T05:26:21+5:30
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे भाजपामध्ये जाण्याच्या तयारीत असले तरी, काँग्रेससह राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे किमान १० आमदार भाजपात आणण्याची अट भाजपा नेतृत्वाने
- अतुल कुलकर्णी, मुंबई
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे भाजपामध्ये जाण्याच्या तयारीत असले तरी, काँग्रेससह राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे किमान १० आमदार भाजपात आणण्याची अट भाजपा नेतृत्वाने राणे यांना घातली असून, या अटीच्या पूर्ततेनंतरच त्यांना केंद्रात मंत्रीपद देण्याची तयारी दर्शविल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
तर राणे यांना राज्यातच महसूलमंत्रीपद देण्याची तयारी भाजपाने दर्शविल्याचे राणे यांच्या निकटवर्तीयांचे म्हणणे आहे. महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कोणतीही अडचण निर्माण न करता राज्यात काँग्रेस खिळखिळी करायची असा सूर भाजपात आहे.
गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसमध्ये अस्वस्थ असलेले नारायण राणे यांनी पुत्र नीलेश यांच्यासह अहमदाबाद येथे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची भेट घेतल्याचे वृत्त आहे. राणे यांनी या वृत्ताचे खंडण केले असले तरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राणे पितापुत्रांचे एका गाडीतील चलचित्र वृत्तवाहिन्यांवर झळकले आहे.
काँग्रेसच्या राज्यातील नेतृत्वावर नाराज असलेले राणे यांनी पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेऊन आपले गाऱ्हाणे त्यांच्यापुढे मांडले. या वेळी त्यांनी प्रदेशाध्यक्ष पदावर दावा सांगितल्याचे समजते. मात्र, या पदाऐवजी राणेंना विधीमंडळाचे नेतेपद देण्याची तयारी दिल्लीने दर्शवली होती. पक्षीय पातळीवर हे पद प्रदेशाध्यक्षाच्या बरोबरीचे समजले जाते. राष्ट्रवादीचे नेतेपद अजित पवार यांच्याकडे आहे. काँग्रेसमध्ये हे पद सध्या रिक्त आहे. पण राणे यांना प्रदेशाध्यक्षपदच हवे होते. मात्र, राणेंच्या एकूण हालचाली पाहून काँग्रेस नेतृत्वाने सावध भूमिका घेतली आहे.
दरम्यान, राणे यांच्यासारखा नेता जर भाजपात येत असेल तर त्याचे मोठे भांडवल करायचे आणि त्यातून तयार होणाऱ्या ‘परसेप्शन’चा फायदा घेत विरोधकांना फोडायचे अशी रणनिती भाजपाकडून आखली जात आहे. त्यामुळेच राणे यांच्या भाजपा नेत्यांच्या भेटीच्या बातम्यांना जाणीवपूर्वक हवा दिली जात आहे. राणे यांनी त्यांच्या वाढदिवसाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावले. दोघांनीही एकमेकांची तारीफ केली. अहमदाबादला राणे त्यांच्या सल्लागाराना भेटण्यास गेले होते असे सांगत असले तरी त्यांचा स्वभाव लक्षात घेता ते सल्लागाराला बोलावून घेतील की त्याला भेटायला जातील? असा सवाल एका ज्येष्ठ नेत्याने केला.
राणे यांनी विरोधकांनी काढलेल्या संघर्ष यात्रेत फक्त एका सभेला हजेरी लावली. होती. अधिवेशन काळातही त्यांनी भाजपावर टोकाची टीका केली नाही. पण दिल्लीत जाऊन मात्र त्यांनी राहूल गांधी यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्या विरुध्दच्या तक्रारींचा पाढा वाचला. राज्यात पक्ष जिवंत ठेवण्याचे कोणतेही काम होत नाहीत, पक्ष आणि कार्यकर्ते टिकवण्याची कोणालाही चिंता नाही, आमदारांना कोणी विचारत नाही, पक्षाचे प्रभारी मोहन प्रकाश आणि माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे साटेलोटे करुन यवतमाळमध्ये भाजपाच्या सोबत जातात व प्रदेशाध्यक्ष खा. चव्हाण नुसती बघ्याची भूमिका घेतात. तुम्ही व पक्षाच्या नेत्यांनी मला ६ महिन्यात मुख्यमंत्री करण्याचा शब्द दिला होता त्याला कित्येक वर्षे होऊन गेली असेही राणे यांनी ऐकवल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. राणे यांनी प्रदेशाध्यक्षपदाची मागणी केली होती. राहुल गांधींनी सर्व ऐकून घेतले, मात्र आपल्या तक्रारीचे निवारण केले नाही असे सांगत राणे यांनी गुरुवारी आपली नाराजी जाहीर केली.
नारायण राणे उवाच...
मुख्यमंत्र्यांसोबत यापूर्वी मी दोनवेळा प्रवास केला. मी अहमदाबादेत होतो, पण अमित शाह यांना भेटलो नाही. अहमदाबादच्या हयात हॉटेलमध्ये माझी वैयक्तिक मीटिंग होती, रात्री साडेदहानंतर मी कुठेही जात नाही, त्यामुळे त्यांना भेटण्याचा प्रश्नच नाही, मी अमित शाह यांच्या घरी गेलो म्हणता, मग तिथून बाहेर पडताना व्हिडीओ आहे का तुमच्याकडे? सकाळी पावणे सात वाजता मुंबईत परत आलो. भाजपाकडून जुनीच आॅफर आहे. मी त्यांना हो किंवा नाही असे काहीही बोललो नाही.
मुख्यमंत्री म्हणाले,
माझी आणि नारायण
राणे यांची अहमदाबादला कोणतीही भेट झाली नाही. मी त्यांच्यासोबत नव्हतो.
आता मार्केटमध्ये चांगला माल असेल, तर सगळे विचारतातच ना, निर्णय जाहीर करेन त्या वेळी बोलेन, तेव्हाचे तेव्हा..!
- नारायण राणे