पेंग्विनमुळे राणीबागेला ‘अच्छे दिन’!

By admin | Published: April 8, 2017 03:06 AM2017-04-08T03:06:19+5:302017-04-08T03:06:19+5:30

गेल्या अनेक वर्षांपासून प्राणिसंग्रहालयात प्राणी नसल्याने, टीकेला सामोरे जाणाऱ्या राणीबागेचे पेंग्विन आगमनानंतरच ‘अच्छे दिन’ सुरू झाले

Ranbagan 'good day' due to penguin! | पेंग्विनमुळे राणीबागेला ‘अच्छे दिन’!

पेंग्विनमुळे राणीबागेला ‘अच्छे दिन’!

Next

चेतन ननावरे,

मुंबई- गेल्या अनेक वर्षांपासून प्राणिसंग्रहालयात प्राणी नसल्याने, टीकेला सामोरे जाणाऱ्या राणीबागेचे पेंग्विन आगमनानंतरच ‘अच्छे दिन’ सुरू झाले आहेत. दर महिन्याला सरासरी लाखभर पर्यटक भेट देणाऱ्या राणीबागेत पेंग्विन आणल्याने, महिन्याभरात दोन लाखांहून अधिक पर्यटकांनी भेट दिली आहे. इतकेच नाही, तर पर्यटक वाढीमुळे प्रशासनाने अवघ्या अर्ध्या महिन्यातच ११ लाख १६ हजार २२ रुपयांची कमाई केली आहे.
गेल्या वर्षभरात कधीही राणीबागेत एकाच महिन्यात दोन लाख पर्यटकांनी भेट दिलेली नाही. इतकेच नव्हे, तर या विक्रमी गर्दीमुळे महापालिकेच्या तिजोरीत वर्षभरातील सर्वाधिक महसुलाची नोंद झाली आहे. याआधी गेल्या वर्षी मे महिन्याच्या सुट्टीत राणीबागेत सर्वाधिक म्हणजे १ लाख ५० हजार ८१० पर्यटकांनी भेट दिली होती. त्यात १ लाख २९ हजार २५० प्रौढ, तर २१ हजार ५६० बारा वर्षांखालील पर्यटकांचा समावेश होता. या पर्यटकांमुळे पालिकेला ६ लाख ८९ हजार ३७० रुपयांचा महसूल मिळाला होता. मात्र, १८ मार्चला पेंग्विन दर्शन खुले केल्यानंतर, अवघ्या ४ एप्रिलपर्यंत म्हणजेच १६ दिवसांत पालिकेच्या तिजोरीत ११ लाख १६ हजार २२ रुपये जमा झाले आहेत. त्यातही बुधवारी राणीबाग पर्यटकांसाठी बंद असतानाही, पालिकेच्या महसुलात चौपट वाढ झाली आहे.
अद्याप राणीबागेत प्रवेशासाठी प्रौढांकडून प्रतिव्यक्ती ५ रुपये, तर ३ ते १२ वर्षांमधील बालकांकडून प्रत्येकी २ रुपये तिकीट दर आकारले जातात. त्यातही शैक्षणिक सहलीमधील शाळकरी मुलांकडून सवलतीच्या दरात प्रति विद्यार्थी १ रुपये नाममात्र शुल्क घेतले जाते. महत्त्वाची बाब म्हणजे, शुक्रवारी तर १२ वर्षांखालील मुलांना मोफत प्रवेश मिळतो. तरीही इतक्या मोठ्या प्रमाणात कमाई होत आहे.
कमाईचे नवे उच्चांक
पेंग्विन दर्शनाच्या दुसऱ्याच दिवशी कमाईचा नवा उच्चांक नोंदवण्यात आला आहे. या एका दिवसात भेट दिलेल्या पर्यटकांच्या तिकीट, बाईक व कार पार्किंग शुल्क, कॅमेरा शुल्क अशा विविध माध्यमातून प्रशासनाला १ लाख १० हजार ४९५ रुपयांची कमाई झाली आहे. याउलट गेल्या वर्षी विविध सात महिन्यांत एक लाखाहून कमी कमाईची नोंद आहे.
राणीबागेत किलबिलाट वाढला
एकट्या मार्च महिन्यात २९ हजार ९७१ बालपर्यटकांनी राणीबागेला भेट दिल्याची माहिती आहे. याआधी मे महिन्याची सुटी वगळता कोणत्याही महिन्यात २० हजारांहून अधिक बालकांनी राणीबागेला भेट दिली नव्हती. याउलट पेंग्विन दर्शन सुरू झाल्यापासून रोज सरासरी अडीच ते तीन हजार बच्चेकंपनी पेंग्विन पाहण्यास हजेरी लावत आहे. हा आकडा वाढण्याची शक्यता आहे़
३ लाखांहून अधिक पर्यटक भेटीला
महापालिकेच्या माहितीनुसार, मार्च महिन्यात
२ लाख २७ हजार पर्यटकांनी राणीबागेला भेट दिली आहे. मात्र, या आकडेवारीत अपंग आणि ज्येष्ठ नागरिकांची संख्या नाही. त्यामुळे ज्येष्ठ आणि अपंग पर्यटकांची संख्या पकडल्यास राणीबागेला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या तीन ते साडेतीन लाखांच्या घरात जाते.
पर्यटकांचा महापूर
पेंग्विनमुळे रविवारी तर राणीबागेत पर्यटकांचा महापूर येत आहे. पेंग्विन दर्शन खुले झाल्यानंतर, पहिल्याच रविवारी २१ हजार ८०० पर्यटकांनी राणीबागेला भेट दिली होती, तर दुसऱ्या रविवारी पर्यटकांचा आकडा २० हजार ७१८ इतका होता.
...तर महापालिकेचा महसूल २० पटीने वाढणार!
महापालिकेच्या स्थायी समितीमध्ये दरवाढीचा प्रस्ताव मंजूर झाला असून, लवकरच प्रौढांकडूून १०० रुपये तिकीटदर आकारण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालिकेच्या महसुलात आणखी २० पटीने वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत राणीबागेच्या पुनर्विकास प्रकल्पासाठी आवश्यक निधी वसूल होण्याची शक्यता आहे. परिणामी, याच निधीतून विकासनिधी उपलब्ध झाल्यास, भविष्यात विविध प्रजातीचे नवे प्राणी राणीबागेत पाहण्याची संधी पर्यटकांना मिळेल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.
>काचघरातील खडकांना तडे
वर्षभराच्या वादावादीनंतर १७ मार्च रोजी पेंग्विनच्या कक्षाचे द्वार मुंबईकरांसाठी खुले करण्यात आले. तेव्हापासून राणीच्या बागेला उसंत नाही. दररोज आठ ते दहा हजार मुंबईकर पेंग्विन पाहण्यासाठी येत असतात. मात्र पेंग्विनला ठेवण्यात आलेल्या काचघरातील खडकांना तडे गेल्याची तक्रार वॉचडॉग फाउंडेशनच्या गॉडफ्रे पिमेंटा यांनी केली आहे.
मात्र प्रशासनाने या आरोपांचे खंडन करत ही तर विशेष डिझाईन असल्याचा दावा केला आहे. दुसरीकडे पेंग्विनच्या काचघरातील खडकांना दोन ठिकाणी तडा गेल्याचे दिसून येत आहे. पारदर्शक काचघर तयार करणाऱ्यांना हे तडे दिसलेच असतील. त्यांनी ते बुजवावे, असा टोला भाजपाचे गटनेते मनोज कोटक यांनी लगावला आहे.
तसेच पेंग्विन प्रकल्पासाठी ‘आॅफिसर आॅफ द मंथ’ या किताबाने गौरविण्यात आलेल्या अधिकाऱ्यांना याचा जाब विचारा, अशी सूचनाही त्यांनी केली. दरम्यान, हे तडे नैसर्गिक असून, चिंतेचे कारण नाही. या तक्रारीमध्ये काही तथ्य नाही. पेंग्विन कक्ष खुला झाल्यापासून येथे रोज सरासरी १० हजार लोकांची गर्दी होत आहे. महिन्याभरात साडेतीन लाख पर्यटक राणीच्या बागेत येऊन गेले आहेत.
पेंग्विनच्या मुद्द्यांवरून यापूर्वीच सत्ताधारी वर्गावर विशेषत: शिवसेनेवर टीका झाली आहे. मुळात राणीच्या बागेतील प्राण्यांसह पक्ष्यांची काळजी घेण्यास प्रशासन समर्थ नाही, असा सूर विरोधकांसह पक्षिमित्रांनी लगावला आहे.
राणीबागेला एप्रिल २०१६ ते मार्च २०१७ दरम्यान भेट दिलेल्या पर्यटकांची महिनानिहाय आकडेवारी
महिनाप्रौढबालकएकूण पर्यटक
एप्रिल-२०१६९०,२४७१,२५९९१,५०६
मे-२०१६१,२९,२५०२१,५६०१,५०,८१०
जून-२०१६६७,३००७,४७०७४,७७०
जुलै-२०१६६२,३२१४,५६०६६,८८१
आॅगस्ट-२०१६८३,३७९९,२०८९२,५८७
सप्टेंबर-२०१६७७,८५६८,७१४८६,५७०
आॅक्टोबर-२०१६८४,४४७१०,४६९९४,९१६
नोव्हेंबर-२०१६१,०५,५००१८,६३२१,२४,१३२
डिसेंबर-२०१६१,०३,८००१७,५०७१,२१,३०७
जानेवारी-२०१७१,२२,०४२१७,९५५१,३९,९९७
फेब्रुवारी-२०१७८६,०५८१२,३१३९८,३७१
मार्च-२०१७१,९८,०००२९,९७१२,२७,९७१
एकूण१२,१०,२००१,५९,६१८१३,६९,८१८

Web Title: Ranbagan 'good day' due to penguin!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.