रणदिवेंचा उल्लेख राहून गेला

By admin | Published: January 7, 2016 02:16 AM2016-01-07T02:16:13+5:302016-01-07T02:16:13+5:30

‘संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा इतिहास जिवंत राहावा, या साठी मुंबईत उभारलेल्या दालनात दिनू रणदिवे यांचा उल्लेख अनवधानाने राहून गेला

Randivedev went on to mention | रणदिवेंचा उल्लेख राहून गेला

रणदिवेंचा उल्लेख राहून गेला

Next

ठाणे : ‘संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा इतिहास जिवंत राहावा, या साठी मुंबईत उभारलेल्या दालनात दिनू रणदिवे यांचा उल्लेख अनवधानाने राहून गेला, त्याबाबत मी जाहीर माफी मागतो. या दालनात त्यांचे साहित्य, त्यांच्या आठवणी आणि अनुभवांचा संग्रह ठेवण्यात येईल,’ असे आश्वासन शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि त्यांच्या मुखपत्राचे संपादक उद्धव ठाकरे यांनी दिले.
मराठी पत्रकार परिषद, ठाणे शहर दैनिक पत्रकार आणि जिल्हा पत्रकार संघाने बुधवारी गडकरी रंगायतनमध्ये पत्रकार दिन व पुरस्कार वितरण सोहळा आयोजित केला होता. त्यात प्रमुख पाहुणे म्हणून ठाकरे बोलत होते. या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांना ठाकरे यांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांना कधी हल्ल्याची भीती वाटली नाही. त्यांच्या पत्रकारितेचा आदर्श आताच्या पत्रकारांनी घेतला, तर त्यांनाही हल्ल्याची भीती वाटण्याचे कारण नाही. पूर्वीचे पत्रकार लोकांनी शहाणे व्हावे म्हणून लिहायचे. आताचे काही पत्रकार मात्र मी स्वत: किती शहाणा आहे, हे दाखविण्यासाठी लिहितात. पत्रकारांची ही वाटचाल कशी स्वीकारायची, असा प्रश्न त्यांनी केला. पत्रकार हा समाजाचा महत्त्वाचा घटक आहे. पत्रकारांनी समोरच्यावर टीका जरूर करावी, पण ती चूक दाखविणारी असावी. हाती असलेल्या शस्त्राने समोरच्यावर वार करून त्याला रक्तबंबाळ करू नये. आम्ही चुकलो तर आम्हाला आरसा दाखवा, मार्गदर्शक म्हणून आमच्या सोबत रहा, असे आवाहन त्यांनी केले.
लहानपणापासून घरात संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचे वातावरण होते. तो प्रभाव आजही माझ्यावर कायम असून, पुढील पिढीला या चळवळीचा इतिहास कळावा म्हणूनच दालन उभारल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पत्रकारांनीच पथ्य पाळले, लिहिताना मर्यादांचे भान ठेवले, तर त्यांच्यावर कोण हल्ला करेल? पत्रकारांवर हल्ले होता कामा नयेत, या मताचा मी आहे, पण त्यांनी सीमा नीट पाळल्या, मर्यादा ओळखल्या, तर सर्व जण गुण्यागोविंदाने राहतील, असा सल्लाही ठाकरे यांनी दिला.
विदर्भाला अनेक खाती मिळाली आहेत. मुख्यमंत्रीही विदर्भाचेच आहेत. त्यामुळे विदर्भाचा हवा तेवढा विकास करा. मात्र, महाराष्ट्र तोडू नका, अशी स्पष्ट भूमिका ठाकरे यांनी मांडली.
सत्काराला उत्तर देताना दिनू रणदिवे यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या आठवणींना उजाळा दिला, तसेच बाळासाहेबांनी कशा रीतीने न डगमगता संयुक्त महाराष्ट्र पत्रिकेला व्यंगचित्रे दिली, त्याचे दाखले रणदिवे यांनी यावेळी दिले.
वृत्तपत्रांचे प्रॉडक्ट झाले असल्याने आता संपादकांच्या वर प्रॉडक्ट मॅनेजर आले आहेत. वाचकाला नेमके काय द्यायचे, मजकुराची जाहिरातीशी सांगड कशी घालायची, या बाबतचे सर्व निर्णय ते घेतात, पण त्यांनाही वृत्तपत्रांचे आणि पत्रकारितेचे ज्ञान देण्याची गरज आहे. तसे झाले, तरच पत्रकारितेची परंपरा कायम राहील, अशी भूमिका ज्येष्ठ पत्रकार अरूण टिकेकर यांनी मांडली.
ठाणे जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकाराला दिला जाणारा जीवनगौरव पुरस्कार सुधीर कोऱ्हाळे यांना देण्यात आला, तसेच उत्कृष्ट जिल्हा पत्रकार संघाचा रंगाण्णा वैद्य आदर्श जिल्हा पत्रकार संघ पुरस्कार भंडारा जिल्ह्याला देण्यात आला.
पाकला इशारे देणारे मोदी दिसावेत
मोदी यांनी निवडणुकीपूर्वी पाकला जे कडक इशारे दिले होते तसेच सडेतोड उत्तर ते आताही देतील अशी, आशा व्यक्त करत देशात घडणाऱ्या घटनांची नोंद जनता डोळसपणे घेत असते, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लगावला.
ठाकरे पुढे म्हणाले की, पाकिस्तानने आतापर्यत आपला घातच केला आहे. पाकशी किती काळ चांगल्या भावनेने चर्चा करणार? परिस्थिती नियंत्रणात नसेल तर किती काळ चर्चेची वाट बघणार? लवकरात लवकर सडेतोड उत्तराची अपेक्षा आहे असल्याचे ठाकरे म्हणाले.
राज्यातही फॉर्म्युल्याची आवश्यकता
दिल्लीत वाहतूक कोंडीवर मात करण्याकरिता लागू केलेल्या सम-विषम फॉर्मुल्याचे स्वागत होत असून आपल्याकडेही वाहतूक कोंडी टाळण्याकरिता अशाच एखाद्या फॉर्म्युलाची आवश्यकता आहे, असे ठाकरे म्हणाले. सम-विषम क्रमांकाची वाहने विशिष्ट दिवशीच रस्त्यावर आणावीत या फॉर्म्युलाचे त्यांनी थेट समर्थन केले नाही. यावर मत मागवत असल्याचे मोघम उत्तर दिले.
शिवसेना मंत्र्यांना कॉनव्हॉय हवा
पाकिस्तानी पत्रकारांना सुरक्षा दिली जाते तर आपल्या मंत्र्यांना का नको? मंत्री हे देखील जनतेचेच काम करीत आहेत. त्यांना कॉनव्हॉय द्यायचा की नाही हा सरकारचा प्रश्न आहे. मात्र हे मंत्री जिथे जातील तिथे त्यांना सुरक्षा मिळावी, अशी अपेक्षा आहे, असेही ते म्हणाले.
खैरे यांची पाठराखण
शेतकऱ्यांना सर्वात जास्त मदत शिवसेनेनी केली आहे. यापुढेही करणार आहे. त्यामुळे खैरे यांच्या घरातील विवाह सोहळ््यानिमित्त केलेल्या खर्चाचाा बाऊ करण्याची गरज नाही, असे सांगत ठाकरे यांनी खैरे यांची पाठराखण केली.
अच्छे दिन नव्हे;
चांगले दिवस येतील
सर्वांनी मिळून एकोप्याने काम केले तर अच्छे दिन नाही तर चांगले दिवस आल्याशिवाय राहणार नाही असा टोमणाही ठाकरे यांनी मोदींना कार्यक्रमातील भाषणाच्या शेवटी दिला.

Web Title: Randivedev went on to mention

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.