राणे-ठाकरे एकत्र ! राजीनामा नाट्य संपले?
By Admin | Published: May 18, 2014 11:45 AM2014-05-18T11:45:14+5:302014-05-18T11:45:14+5:30
लोकसभा निवडणुकीत राज्यातील निराशाजनक कामगिरीनंतर मुख्यमंत्र्यांशी फारसे सख्य नसलेले राणे आणि ठाकरे एकत्र आल्याने वेगळीच चर्चा सुरु झाली आहे.
अतुल कुलकर्णी
राज्याचे उद्योगमंत्री नारायण राणे यांची समजूत काढली आहे. त्यामुळे त्यांचा राजीनामा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पक्षश्रेष्ठींकडे पाठवण्याचा प्रश्नच येत नाही. आलेल्या राजकीय परिस्थितीतून कसा मार्ग काढायचा यावर चर्चा करण्यासाठी येत्या मंगळवारी बैठक बोलावणार आहोत असे सांगत प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी राणे राजीनामा नाट्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. शनिवारी घडलेल्या राजकीय घडामोडीत मुख्यमंत्र्यांशी फारसे सख्य नसलेले राणे आणि ठाकरे एकत्र आल्याने वेगळीच चर्चा सुरु झाली आहे. त्यातच मुख्यमंत्री सोमवारी दिल्लीला पक्ष कार्यकारिणीच्या बैठकीसाठी जाणार असताना ठाकरे यांनी लगेचच मंगळवारी बैठक बोलावल्याने काँग्रेसमधील हालचालींना गती आली आहे. डॉ. निलेश राणे यांचा पराभव झाला. राणेंच्या कुडाळ विधानसभा मतदार संघातून देखील २१,८८३ मतांचा फटका निलेश यांना बसला. या धक्क्याने राणे यांनी तातडीने मंत्रीपदाचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे पाठवला होता. मात्र आज दुपारी राणे मुंबईत आल्याचे कळताच माणिकराव ठाकरे स्वत: राणे यांच्या ज्ञानेश्वरी या शासकीय निवासस्थानी गेले. तेथून ते राणे यांना घेऊन काँग्रेस पक्ष कार्यालयात आले. दोघांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न ? राणे-ठाकरे चर्चेचा तपशिल मिळाला नाही पण राष्टÑवादीच्या बंडापासून ते मुख्यमंत्र्यांच्या नाराजीपर्यंतचे विषय यात निघाल्याचे समजते. ठाकरे यांचेही मुख्यमंत्र्यांशी फारसे सख्य नाही. त्यामुळे राणेंच्या घरी जावून त्यांना घेऊन पक्ष कार्यालयात येणे या मागे मुख्यमंत्र्यांवर दबाव आणण्याचाही प्रयत्न असल्याचेही बोलले जात आहे़ ही वेळ राजीनामा देण्याची नाही. पक्ष नेतृत्व जो निर्णय घ्यायचा असेल तो घेईल. राजीनाम्याने प्रश्न सुटणार नाहीत. उलट समोर आलेल्या परिस्थितीतून मार्ग काढून विधानसभेची तयारी केली पाहिजे. - माणिकराव ठाकरे, प्रदेशाध्यक्ष दिल्लीत पक्षश्रेष्ठींच्या बैठकीत काय चर्चा होते व कोणते निर्णय होतात त्यावरही मंगळवारी प्रदेशाध्यक्षांनी आयोजित केलेल्या बैठकीचे भवितव्य अवलंबून असणार आहे.