राणे समर्थकाची कार फोडली, मनसे जिल्हाध्यक्षासह आठजण ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2017 09:18 PM2017-10-16T21:18:27+5:302017-10-16T21:19:02+5:30
ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानाच्या मध्यरात्री कुडाळ तालुक्यातील भोईचे केरवडेचे उपसरपंच तसेच कट्टर राणे समर्थक राजन मल्हार यांच्या कारची तोडफोड
कुडाळ : ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानाच्या मध्यरात्री कुडाळ तालुक्यातील भोईचे केरवडेचे उपसरपंच तसेच कट्टर राणे समर्थक राजन मल्हार यांच्या कारची तोडफोड केल्याप्रकरणी मनसेचे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांच्यासह भोईचे केरवडे येथील आठ जणांवर कुडाळ येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मल्हार यांच्या कारवर झालेल्या हल्ल्यामुळे तालुक्यात खळबळ माजली आहे.
कुडाळ तालुक्यातील ५४ ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे. यामध्ये भोईचे केरवडे ग्रामपंचायतीचाही समावेश आहे. दरम्यान, मतदानाच्या मध्यरात्री मल्हार यांच्या कारवर भोईचे केरवडे येथे हल्ला करण्यात आला. यात त्यांच्या कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याप्रकरणी कुडाळ पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत मल्हार यांनी म्हटले आहे की, ते नोकरीनिमित्त कणकवली येथे राहतात. भोईचे केरवडे ग्रामपंचायतीची निवडणूक असल्याने ते त्यांच्या पॅनेलच्या प्रचारासाठी सध्या गावी आले होते. १५ आॅक्टोबर रोजी कुडाळ येथे त्यांच्या कारमध्ये इंधन भरून रात्री ९ वाजता केरवडे येथे ते आले. त्यावेळी त्यांच्या सोबत त्यांचे शेजारी बाबू उर्फ बाळकृष्ण सावंत होते.
दरम्यान, ते कुडाळहून गावी येताना जाधववाडी येथील रस्त्यावर पावसामुळे पाणी आल्याने त्यांनी घरी जाण्यासाठी उभ्या असलेल्या श्रावण बांदेकर, सचिन परब या ग्रामस्थांना स्वत:च्या कारमध्ये घेतले व केरवडे-बोडदेवाडी येथे सोडले. त्यानंतर मल्हार पुढे घरी जाण्यासाठी निघाले. रात्री १.१५ वाजण्याच्या सुमारास ते भोईचे केरवडे-मळेवाडी येथे आले असता दुचाकीवरून त्यांच्याच गावातील सुबोध परब व सिद्धेश परब आले. यातील सिद्धेश परब याने त्यांच्याकडील कोणत्यातरी लोखंडी वस्तूने प्रहार करून मल्हार यांच्या कारची समोरील काच फोडली. त्यानंतर मागोमाग कार व दुचाकीने आलेल्या धीरज परब, विवेक परब, विनित परब, सुशांत परब, संतोष परब या सर्वांनी त्यांच्याकडील लोखंडी शिगेने कारच्या काचा, पत्रा, हेडलाईट फोडून नुकसान केले. यामध्ये धीरज परब हा त्याच्या ताब्यातील वाहन घेऊन आला, अशी माहिती मल्हार यांनी दिली.
कारच्या काचा फोडताना कारमध्ये आपण व बाबू सावंत हे अडकून पडलो होतो व या फुटलेल्या काचांच्या तुकड्यामुळे आमच्या हातांना व पायांना दुखापत झाल्याची माहिती राजन मल्हार यांनी दिली. गाडीवर हल्ला केल्यानंतर धीरज परब व त्यांच्या सोबतच्या सर्वांनी ‘तू उद्या ग्रामपंचायतीकडे दिसलास तर याद राख,’ अशी धमकी देत शिवीगाळ केली व ते निघून गेले, असे मल्हार यांनी तक्रारीत म्हटले आहे.
याबाबत कुडाळ पोलिसांत बेकायदेशीर जमाव करीत अडवणूक करून वाहनाची तोडफोड केल्याप्रकरणी तसेच धमकी देऊन दुखापत केल्याप्रकरणी संशयित आरोपी धीरज परब, सिद्धेश परब, सुबोध परब, विवेक परब, विनित परब, सुशांत परब, संतोष परब, सचिन ठाकूर आदी आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संशयित ताब्यात : दत्तात्रय बाकारे
ही घडलेली घटना व ग्रामपंचायत निवडणुकांचे गांभीर्य लक्षात घेऊन या प्रकरणातील सर्व संशयित आरोपींना भोईचे केरवडे येथून तत्काळ ताब्यात घेऊन अटक केली असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय बाकारे यांनी दिली.
घटनास्थळावरून पोलिसांनी दोन लोखंडी शिगा ताब्यात घेतल्या आहेत. याबाबतचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय बाकारे करीत आहेत. तक्रारदार राजन मल्हार हे कट्टर राणे समर्थक आणि भोईचे केरवडे ग्रामपंचायतीचे उपसरपंच आहेत. संशयित आरोपी धीरज परब हे मनसेचे जिल्हाध्यक्ष आहेत. धीरज परब यांचे वडील विश्वनाथ परब हे भोईचे केरवडे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतील उमेदवार आहेत.
धीरज परबसह तिघेजण नजरकैदेत-
मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांना पोलिसांनी अटक केल्यानंतर न्यायालयाने आठ जणांपैकी पाच जणांना जामीन मंजूर केला. धीरज परबसह विनित परब व विवेक परब यांना नजरकैदेत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. ही नजरकैद पुढील ४८ तासांची असणार आहे, असे न्यायालयाने पोलिसांना सांगितले.