चिपळूणमधील काँग्रेसच्या बैठकीत राणे समर्थकाचा गोंधळ, दंगल नियंत्रक पथक तैनात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2017 02:16 AM2017-09-10T02:16:22+5:302017-09-10T02:16:32+5:30
सिंधुदुर्गापाठोपाठ रत्नागिरी जिल्हा काँग्रेसने शनिवारी चिपळूण येथे बोलाविलेल्या बैठकीतही जोरदार गदारोळ झाला.
चिपळूण (जि.रत्नागिरी) : सिंधुदुर्गापाठोपाठ रत्नागिरी जिल्हा काँग्रेसने शनिवारी चिपळूण येथे बोलाविलेल्या बैठकीतही जोरदार गदारोळ झाला. बैठकस्थळी लावलेल्या बॅनरवर ज्येष्ठ नेते नारायण राणे आणि माजी खासदार नीलेश राणे यांचे छायाचित्र नसल्यामुळे आक्रमक झालेल्या राणे समर्थकांमुळे सभेच्या सुरूवातीपासून गोंधळ सुरू झाला आणि तो वाढतच गेला. अखेर दंगलविरोधी पथक तैनात करण्याची वेळ आली. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या हस्तक्षेपानंतर बैठक शांततेत पार पडली.
चिपळूणमधील ब्राह्मण सहाय्यक संघामध्ये काँग्रसने बैठक बोलाविली होती. खासदार हुसेन दलवाई, जिल्हा प्रभारी विश्वनाथ पाटील, माजी जिल्हाध्यक्ष रमेश कीर उपस्थित होते.
छायाचित्र नसल्याचे कारण पुढे करीत राणे समर्थक कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यामुळे सभेच्या सुरुवातीला गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. त्यानंतर गोंधळी राणे समर्थक कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न झाल्यानंतर तर गदारोळ आणखी वाढली. सभागृहाबाहेर तणावाची परिस्थिती निर्माण झाल्यामुळे दंगल नियंत्रण
पथकाला पाचारण करण्यात
आले.
राणे समर्थक कार्यकर्त्यांनी खासदार हुसेन दलवाई व विश्वनाथ पाटील यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. पोलिसांना राणे समर्थकांना शांत कसेबसे यश
आले त्यानंतर मात्र बैठक शांततेत झाली.
राणे यांना भाजप संधी देणार नाही:हुसेन दलवाई
ज्येष्ठ काँग्रेस नेते नारायण राणे यांनी काँग्रेसमध्येच राहावे. त्यांना भाजप संधी देईल, असे वाटत नाही. त्यामुळे पक्षात राहून पक्षाचे एकजुटीने काम करावे. आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू, असे प्रतिपादन खासदार हुसेन दलवाई या बैठकीत केले.
बैठकीचे निमंत्रणच नाही : सिंधुदुर्ग व रत्नागिरीमध्ये बैठका घेऊन काँग्रेसने अंतर्गत वादाला सुरुवात केली आहे. आम्ही काँग्रेसचे कार्यकर्ते असूनही, आम्हाला या सभेला बोलविण्यात आले नाही. तसेच सभागृहामध्ये लावलेल्या बॅनरवर नारायण राणे व नीलेश राणे यांचा उल्लेख व छायाचित्र नसल्यामुळे राणे समर्थक आक्रमक झाल्याचे काँग्रेसचे शहराध्यक्ष परिमल भोसले यांनी सांगितले.