राणे थंडावले, काँग्रेसमध्येच राहणार
By admin | Published: August 5, 2014 06:15 PM2014-08-05T18:15:25+5:302014-08-05T18:33:44+5:30
काँग्रेस नेतृत्वावर टीकेची तोफ डागून उद्योगमंत्रीपदाचा राजीनामा देणारे नारायण राणेंचे बंड कोणत्याही ठोस आश्वासनाशिवाय थंडावले आहे.
Next
ऑनलाइन टीम
मुंबई, दि. ५ - काँग्रेस नेतृत्वावर टीकेची तोफ डागून उद्योगमंत्रीपदाचा राजीनामा देणारे नारायण राणेंचे बंड थंडावले आहे. काँग्रेस हायकमांडकडून कोणतेही ठोस आश्वासन न मिळूनही नारायण राणेंनी काँग्रेसमध्येच कायम राहणार असल्याचे जाहीर केले आहे. राणेंनी मंत्रीपदाचा कार्यभारही स्वीकारण्याची तयारी दर्शवली असून उद्यापासून राज्यात काँग्रेसच्या प्रचारासाठी उतरु अशी घोषणाही राणेंनी केली आहे.
मंगळवारी संध्याकाळी नारायण राणेंनी त्यांच्या ज्ञानेश्वरी निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. 'काँग्रेसने अद्याप माझा राजीनामा स्वीकारला नाही. राहुल गांधी व अन्य ज्येष्ठ नेत्यांशी मी गेल्या काही दिवसांत भेट घेतली. गेल्या वेळी झालेल्या चूका भविष्यात घडणार नाही असे आश्वासन मला काँग्रेस हायकमांडने दिल्याने मी काँग्रेसमध्येच कायम राहणार आहे असे नारायण राणेंनी जाहीर केले. मात्र हायकमांडने नेमके काय आश्वासन दिले हे त्यांनी सांगणे त्यांनी टाळले. त्यामुळे राणेंची पुन्हा एकदा बोळवणच झाली असून त्यांचा बंड फसल्याचे दिसते. काँग्रेसने मुख्यमंत्रीपदाचे आश्वासन दिले पण ते पूर्ण केले नाही असा आरोप करणारे नारायण राणेंनी आज यूटर्न घेतले. 'मला पदाची लालसा नाही. मी गेली अनेक वर्ष विविध पदांवर कार्यरत आहे. पदच माझ्यामागे धावून येतात असे राणेंनी सांगितले.
लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसने राज्यात नेतृत्व बदल करावे अन्यथा पक्षाचा पराभव अटळ आहे. या पराभवाचा वाटेकरी व्हायचे नाही असे सांगत नारायण राणेंनी दोन आठवड्यांपूर्वी उद्योगमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. याविषयी विचारले असता नारायण राणे म्हणाले, मी काँग्रेसचा पराभव होईल असे म्हटले नव्हते. विधानसभेत काँग्रेसचा विजय व्हावा यासाठी मी प्रयत्न करीन.
पत्रकार परिषदेपूर्वी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, कृपाशंकर सिंह या नेत्यांनी नारायण राणेंच्या ज्ञानेश्वरी निवासस्थानी त्यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी राणेंच्या मनधरणीचे यशस्वी प्रयत्न केले. सुमारे तासभराच्या बैठकीनंतर माणिकराव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत राणेंशी सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगितले. राणे मोहन प्रकाश यांची भेट घेणार असून मोहन प्रकाश राणेंच्या मागण्यांवर दिल्लीत हायकमांडशी चर्चा करतील व हायकमांड त्यावर अंतिम निर्णय घेईल असे माणिकराव ठाकरे यांनी सांगितले.