राणेंची बोळवण दुय्यम खात्यावर!, मंत्रिमंडळ विस्तार दिवाळीनंतर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2017 05:53 AM2017-10-06T05:53:45+5:302017-10-06T05:54:01+5:30
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार दिवाळीनंतर होणार असून नव्या पक्षाची स्थापना केलेले माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा मंत्रिमंडळ समावेश निश्चित झाला आहे.
मुंबई : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार दिवाळीनंतर होणार असून नव्या पक्षाची स्थापना केलेले माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा मंत्रिमंडळ समावेश निश्चित झाला आहे. मात्र, त्यांना दुय्यम खात्यावरच समाधान मानावे लागेल, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
गृह, नगरविकास, महसूल, सार्वजनिक बांधकाम, वित्त ही महत्त्वाची खाती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे आहेत. यापैकी कोणतेही खाते राणे यांना मिळण्याची शक्यता नाही. चंद्रकांत पाटील यांचे मंत्रिमंडळातील ‘नंबर टू’ हे स्थान कायम राहील, असे सूत्रांनी सांगितले. ‘माजी मुख्यमंत्री असल्याने, व याआधी महसूलसारखे महत्त्वाचे खाते सांभाळल्याने आपल्या दर्जाला साजेल, असे मंत्रिपद दिले जावे’, असा राणे यांचा आग्रह आहे. तथापि, त्यांना राज्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या पहिल्या पाच खात्यांपैकी कोणतेही खाते दिले जाणार नाही, असे समजते.
शिक्षण खात्याबाबत तक्रारी
मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे शिक्षण खात्याच्या कारभाराबाबत अनेक तक्रारी आल्या असून त्यांची नोंदही त्यांनी घेतली आहे. त्यामुळे विस्तारामध्ये विनोद तावडेंचे शिक्षण मंत्रीपद काढून त्यांच्याकडे दुसरे महत्त्वाचे खाते दिले जाऊ शकते.
मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावा
मुख्यमंत्री फडणवीस मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावा घेत आहेत. ३१ आॅक्टोबरला त्यांच्या सरकारला तीन वर्षे पूर्ण होत असून त्या निमित्त त्यांनी प्रत्येक मंत्र्याकडून अहवाल मागविला आहे. मंत्रिमंडळ फेरबदलात मंत्र्यांची कामगिरी हा महत्त्वाचा निकष असेल.
मुख्यमंत्री स्वीडनला जाणार
मुख्यमंत्री फडणवीस हे १० ते १४ आॅक्टोबरदरम्यान स्वीडनला जाणार आहेत. तेथील ‘मेक इन इंडिया’ परिषदेत ते सहभागी होणार असून महाराष्ट्रात गुंतवणुकीसंदर्भात विविध कंपन्यांच्या प्रमुखांशी ते चर्चा करतील.
राणे यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला तर शिवसेना सत्तेतून बाहेर पडेल आणि काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येऊन सरकारची कोंडी करतील, असे म्हटले जात असले तरी तसे होण्याची शक्यता नाही. या बाबीची कल्पना आल्यानेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपावरील टीका तीव्र केली असल्याचे मानले जाते.
सरकारच्या स्थैर्याबाबत मुख्यमंत्री फडणवीस निर्धास्त आहेत. अगदीच परिस्थिती निर्माण झाली तर इतर पक्षांमधील २५ ते ३० आमदार भाजपात येतील या बाबत त्यांना विश्वास आहे. मात्र तशी वेळ येणार नाही आणि सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल, या बाबत मुख्यमंत्री निश्चिंत असल्याचे म्हटले जाते.