राणेंच्या काँग्रेसला कानपिचक्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 04:24 AM2017-08-11T04:24:02+5:302017-08-11T04:24:09+5:30
निवडणुका हरल्या म्हणून इंदिरा गांधी घरी बसल्या नव्हत्या. त्या परत लोकांमध्ये गेल्या, जनसंपर्क वाढविला आणि परत विजयी झाल्या. आजच्या काँग्रेस नेत्यांनी त्यांच्याकडून खूपकाही शिकण्यासारखे आहे, अशा शब्दांत काँग्रेस नेते नारायण राणे यांनी स्वपक्षाच्या नेत्यांना कानपिचक्या दिल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : निवडणुका हरल्या म्हणून इंदिरा गांधी घरी बसल्या नव्हत्या. त्या परत लोकांमध्ये गेल्या, जनसंपर्क वाढविला आणि परत विजयी झाल्या. आजच्या काँग्रेस नेत्यांनी त्यांच्याकडून खूपकाही शिकण्यासारखे आहे, अशा शब्दांत काँग्रेस नेते नारायण राणे यांनी स्वपक्षाच्या नेत्यांना कानपिचक्या दिल्या.
माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या कार्याचा गौरव करणारा प्रस्ताव विधान परिषदेत एकमताने संमत करण्यात आला. विधान परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंदिरा गांधी यांचा अभिनंदनपर प्रस्ताव मांडला. काय योगायोग आहे आज ज्या विधिमंडळाच्या इमारतीत आपण चर्चा करत आहोत, त्या इमारतीचे १९ एप्रिल १९८१ साली इंदिरा गांधींनी उद्घाटन केले होते. याच वास्तूमध्ये त्यांचा अभिनंदनाचा प्रस्ताव येणे हे सुखद आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
या वेळी झालेल्या चर्चेदरम्यान बोलताना राणे म्हणाले, आजच्या काँग्रेसने इंदिरा गांधींकडून खूपकाही शिकण्यासारखे आहे. १९७७च्या निवडणुकीतील पराभवानंतर पत्रकारांनी जेंव्हा त्यांच्यावर प्रश्नांचा भडिमार केला तेंव्हा इंदिरा गांधी उसळून म्हणाल्या होत्या, ‘हार गये तो क्या हुआ? घर नहीं बैठेंगे, फिरसे जितेंगे!’ त्याप्रमाणे त्यांनी विजय खेचूनही आणला. पण आजचे काँग्रेस नेते पराभव झाला म्हणून घरी बसले आहेत. घरातून आॅफिस आणि आॅफिसमधून घरी असाच त्यांचा कार्यक्रम बनला आहे. रस्त्यावर उतरावे लागेल, लोकांमध्ये मिसळावे लागेल, असा सल्लाही राणे यांनी दिला. इंदिरा गांधी यांच्या धोरणांंमुळेच देश आज महासत्तेकडे वाटचाल करत असल्याचे गौरवोद्गारही राणे यांनी काढले.