राणेंच्या आमदारकीची वाट बिकटच!७ डिसेंबरला निवडणूक : विरोधक करणार कोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 02:53 AM2017-11-16T02:53:43+5:302017-11-16T02:54:07+5:30
स्वतंत्र पक्ष स्थापन करून भाजपाशी घरोबा केलेले माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना विधान परिषदेवर पुन्हा निवडून येण्यासाठी बरीच दमछाक होईल असे दिसते.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : स्वतंत्र पक्ष स्थापन करून भाजपाशी घरोबा केलेले माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना विधान परिषदेवर पुन्हा निवडून येण्यासाठी बरीच दमछाक होईल असे दिसते. काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना एकत्र येऊन त्यांची कोंडी केली जाऊ शकते.
राणे यांनी काँग्रेसचा राजीनामा देताना विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. या जागेवर ७ डिसेंबरला निवडणूक होत आहे. राणे यांना मंत्रिमंडळात घेण्यास शिवसेनेचा विरोध लपून राहिलेला नाही. त्यामुळे राणे हे भाजपाच्या पाठिंब्यावर निवडणुकीत उतरले तर काँग्रेस व राष्टÑवादीशी हातमिळवणी करून शिवसेना राणेंची कोंडी करू शकते.
भाजपाकडे १२२, शिवसेना ६३, काँग्रेस ४२ तर राष्ट्रवादी ४१ असे पक्षीय बलाबल आहे. भाजपाला १० अपक्ष आमदारांचा पाठिंबा असल्याने त्यांचे संख्याबळ १३२ इतके आहे. त्यामुळे १४५ चा आकडा साधण्यासाठी त्यांना केवळ १३ आमदारांची गरज असेल. गुप्त मतदानाचा अशावेळी भाजपाला फायदा होऊ शकतो. शिवाय, राणेंच्या उमेदवारीला शिवसेनेचा पाठिंबा मिळविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वत: पुढाकार घेतील, असे म्हटले जात आहे.
शिवसेना ही काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाणार नाही, असा भाजपाला विश्वास आहे.
भाजपाने राणेंऐवजी अन्य कुणाला उमेदवारी दिली तर राणेंना जुलै २०१८ पर्यंत आमदारकीची वाट पहावी लागू शकते. त्यावेळी विधानसभेतून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या ११ जागांसाठी निवडणूक होणार आहे. मात्र, राणे यांना त्यांनी राजीनामा दिलेल्या जागेवरच पुन्हा निवडून आणण्याची भूमिका भाजपाकडून घेतली जाईल, असे सूत्रांनी सांगितले.