रंगरेषेचा भाष्यकार हरपला
By admin | Published: July 12, 2017 05:38 AM2017-07-12T05:38:25+5:302017-07-12T05:38:25+5:30
मंगेश तेंडुलकर (वय ८२) यांचे सोमवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने पुण्यातील खासगी रुग्णालयात निधन झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कुंचल्यांच्या फटकाऱ्यांनी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, सामाजिक विषयांवर परखड भाष्य करणारे व्यंगचित्रकार, मिश्कील शैलीत नाटकांचा मागोवा घेणारे नाट्यसमीक्षक, वाहतुकीच्या प्रश्नाला वाचा फोडणारे सजग नागरिक असे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व मंगेश तेंडुलकर (वय ८२) यांचे सोमवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने पुण्यातील खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगी, मुलगा, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. ज्येष्ठ नाटककार दिवंगत विजय तेंडुलकर यांचे ते थोरले बंधू होत.
शेवटपर्यंत कार्यरत असणाऱ्या तेंडुलकर यांच्या निधनाचे वृत्त अनेकांना चटका लावून गेले. सोमवारी सकाळी मूत्राशयाच्या शस्त्रक्रियेसाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शस्त्रक्रिया यशस्वी झाली होती मात्र रात्री उशिरा त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने रुग्णालयातच त्यांची प्राणज्योत मालवली. सकाळी त्यांच्या निधनाची बातमी शहरात वाऱ्यासारखी पसरताच रुग्णालयाकडे अनेकांची पावले वळू लागली. दुपारी १ वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. ‘रंगरेषेचा भाष्यकार हरपला’ अशा शब्दांत कला क्षेत्रातील मान्यवरांनी हळहळ व्यक्त केली.
लेखन आणि पुरस्कार
तेंडुलकरांची ‘भुईचक्र’, ‘पॉकेट कार्टून्स’ आणि ‘संडे मूड’ ही पुस्तकेप्रसिद्ध आहेत. यापैकी ‘संडे मूड’ या पुस्तकासाठी शासनाचा वि. मा. दी. पटवर्धन पुरस्कार मिळाला होता. मसापचा चिं. वि. जोशी पुरस्कार मिळाला होता. व्यंगचित्रांबद्दलचे त्यांचे अनेक लेख वेगवेगळ्या नियतकालिकांमधून प्रसिद्ध झाले आहेत.
त्यात प्रामुख्याने बिचाऱ्या अफझलचे महाराजांस पत्र (जत्रा, १९८९), आमच्या पुण्यातील नाट्यगृहे (जत्रा, १९९८), गुप्ताजींचे सोपे तंत्र (लोकप्रभा), चौकटीतल्या आत्म्याला (आवाज), व्यंगचित्रांतून संवाद साधताना (छात्र प्रबोधन), मोबाईल फ्री (श्री दीपलक्ष्मी), माझ्या गोव्याच्या भूमीत! (गोमांतक), व्यंगचित्र हेच पहिलं प्रेम (ग्राहकहीत), व्यंगचित्रांची भाषा (कुटुंब...च कौटुंबिक), व्यंगचित्रे ही कला नाहीच (किस्त्रिम) असे लेख बरेच गाजले.
मंगेश तेंडुलकर यांचा जन्म १५ नोव्हेंबर १९३६ रोजी झाला. १९५८ मध्ये पुणे विद्यापीठातून त्यांनी विज्ञान शाखेतील पदवी संपादन केली. १९६० ते १९८६ या कालावधीत त्यांनी संरक्षण खात्याच्या मेकॅनिकल प्रयोगशाळेत नोकरी केली. १९९५ पासून तेंडुलकर यांनी पूर्णवेळ व्यंगचित्रकार म्हणून कामाला सुरुवात केली. १९५४ साली त्यांचे पहिले व्यंगचित्र प्रसिद्ध झाले होते.
काही दिवसांपूर्वी त्यांनी स्वत:च्या मृत्यूचेही व्यंगचित्र काढले होते. रेषांच्या फटकाऱ्यांसोबत त्यांनी विविध वर्तमानपत्रे, नियतकालिकांमधून ललित लेखनही केले होते.
चित्रकलेचे कोणतेही शिक्षण घेतले नसतानाही त्यांना कलेचे नैसर्गिक वरदान लाभले होते. तेंडुलकरांनी आयुष्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत
ब्रश सोडला नव्हता. ते वयाच्या पंचाहत्तरीनंतरही उत्साहाने कार्यरत होते. विविध सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रम, चर्चासत्रे, परिसंवादांमध्ये ते हिरिरीने सहभागी होत असत. अगदी मागील महिन्यातच पुण्यामध्ये त्यांच्या व्यंगचित्रांचे प्रदर्शन भरले होते.
त्यांची पुण्याच्या वाहतुकीविषयी व्यंगचित्रे गाजली.
दिवाळीच्या सुमारास पुण्याच्या चौकात उभे राहून वाहतुकीविषयक जागृती करणारी भेटकार्डांचे ते नागरिकांमध्ये वाटप करीत असत.
ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांच्या निधनाने सामाजिक विसंगतीवर रेषांच्या सहाय्याने प्रभावी भाष्य करणारा कलावंत आपण गमावला आहे. त्यांची व्यंगचित्रे सामाजिक प्रश्नांवर नेमकी बोट ठेवायची. सहज साध्या प्रसंगावरही ते मार्मिकतेने हास्यचित्र रेखाटायचे. त्यांच्या व्यक्तिमत्वातील साधेपणा त्यांच्या चित्रातही उमटायचा. एक हास्य व्यंगचित्रकार म्हणून त्यांची ख्याती होतीच परंतु त्यांचे ललित लेखनही लोकप्रिय होते. त्यासोबतच सामाजिक बांधिलकीपोटीही विविध सामाजिक प्रश्नाबाबत ते सक्रीय होते.
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री.
मंगेश तेंडुलकर यांच्या निधनाने साध्या, सोप्या चित्रसंकल्पनांच्या माध्यमातून बोलकी हास्य चित्रे रेखाटणारा व्यंगचित्रकार गमावला आहे. त्यांनी स्वत:ची शैली आणि वेगळी ओळख निर्माण केली होती.
- विनोद तावडे, सांस्कृतिक कायमंत्री