मुंबई होणाऱ्या मराठी क्रांती मोर्चाची औरंगाबादमध्ये रंगीत तालिम
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2017 02:56 PM2017-08-01T14:56:26+5:302017-08-01T14:59:10+5:30
9 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये होणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी औरंगाबादमध्ये भव्य बाईक रॅली काढण्यात आली.
औरंगाबाद, दि. 1- 9 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये होणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी औरंगाबादमध्ये भव्य बाईक रॅली काढण्यात आली. मुंबईतील मोर्चाची पूर्व तयारी म्हणून ही रंगीत तालीम करण्यात आल्याची चर्चा सध्या सुरू आहे. औरंगाबाद शहरातून निघालेल्या या रॅलीमध्ये महिलांनीही मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला होता. यावेळी एक मराठा लाख मराठा, अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या.
मराठा क्रांती मोर्चाच्या या बाईक रॅलीला छत्रपती महाविद्यालयापासून सुरुवात झाली. गजानन मंदिर, क्रांती चौक, जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गे कॅनॉट परिसरात या रॅलीचा समारोप झाला. हजारोंच्या संख्येने महिलांनी तसंच अनेक तरूण-तरूणी या रॅलीत सहभागी झाले होते.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पहिला मूक मोर्चा औरंगाबद शहरामधून काढण्यात आला होता. त्यानंतर राज्यभरात विविध शहरात मोठ्या संख्येने ५७ मोर्चे काढण्यात आले. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी हे मोर्चे काढण्यात आले. पण सरकारकडून कोणतंही ठोस आश्वासन मिळालं नाही. त्यामुळे ९ ऑगस्ट रोजी मुंबईत मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यासाठी गेल्या काही दिवसांपासून औरंगाबादमध्ये नियोजन बैठकाही घेण्यात आल्या. त्याचाच भाग म्हणून मंगळवारी शहरात बाईक रॅली काढण्यात आली.
9 ऑगस्टला मुंबईत मराठा क्रांती मोर्चाचा एल्गार
येत्या 9 ऑगस्ट रोजी मुंबईत मराठा क्रांती मोर्चाचे वादळ मुंबईत धडकणार आहे. सर्व आचारसंहितांचे पालन करून हा महामोर्चा काढला जाईल. ९ ऑगस्टला क्रांतिदिनी पहिला मोर्चा निघाला होता. म्हणून मुंबईतील महामोर्चा ९ ऑगस्टला काढला जाणार आहे. मुंबईत 9 ऑगस्ट रोजी आयोजित मराठा क्रांती मूक मोर्चात जास्तीत जास्त मराठा समाजाने सहभागी व्हावे,यासाठी मराठा क्रांती मोर्चातर्फे काही दिवसांपूर्वी रथयात्रा काढण्यात आली. टिव्ही. सेंटर येथे सकाळी छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून रथयात्रा कोपर्डीच्या प्रवासाला रवाना झाली.
कोपर्डीतील अत्याचाराच्या घटनेला १३ जुलै रोजी एक वर्ष पूर्ण झालं. या घटनेतील नराधमांना फाशी द्या, मराठा समाजाला आरक्षण द्या, स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करा, यासह विविध मागण्यासाठी गतवर्षी ९ ऑगस्ट २०१६ रोजी औरंगाबादेत पहिला मराठा क्रांती मूक मोर्चा काढण्यात आला होता.