रांगोळीतून बाल अत्याचारविरोधी मुद्रा
By Admin | Published: September 14, 2016 03:52 AM2016-09-14T03:52:02+5:302016-09-14T03:52:02+5:30
गणरायाच्या वैभवशाली मिरवणुकीच्या मार्गावर रांगोळीच्या माध्यमातून बाल अत्याचारविरोधी प्रबोधनाचा जागर होणार आहे.
पुणे : गणरायाच्या वैभवशाली मिरवणुकीच्या मार्गावर रांगोळीच्या माध्यमातून बाल अत्याचारविरोधी प्रबोधनाचा जागर होणार आहे. विविध मार्गाने लहान मुला-मुलींवर होणाऱ्या अन्याय-अत्याचारांची मुद्रा रांगोळीतून मिरवणूक मार्गावर उमटेल. प्रबोधनाचा हा आगळावेगळा जागर प्रमुख विसर्जन मार्ग असलेल्या लक्ष्मी रस्त्यावरील ११ चौकांमध्ये पाहायला मिळेल.
ढोलताशाचा गजर, आगळावेगळा थाट अन् परंपरेला साजेशा डौलात लक्ष्मी रस्त्याने निघणारी लाडक्या बाप्पाची विसर्जन मिरवणूक जगभरात प्रसिद्ध आहे. देश-विदेशातून लाखो गणेशभक्त ही मिरवणूक ‘याचि देही, याचि डोळा’ पाहण्यासाठी येत असतात; पण केवळ आकर्षक रथ, ढोलताशा पथकांचे वादन हेच या मिरवणूकमार्गावरील आकर्षण नसते, तर बाप्पाला नमन करण्यासाठी घालण्यात आलेल्या रांगोळ्यांच्या पायघड्याही लक्ष वेधून घेतात. त्यातही दर वर्षी एखादा सामाजिक विषय घेऊन त्याला प्रबोधनाची जोडही दिली जाते. राष्ट्रीय कला अकादमीचे कलाकार दर वर्षी लक्ष्मी रस्त्यावरील चौकाचौकांत आगळ्यावेगळ्या पद्धतीने प्रबोधनाचा जागर करतात.
अकादमीने या वर्षी लहान मुला-मुलींवरील अत्याचाराविरोधात संदेश देणारा विषय हाताळला आहे. याविषयी माहिती देताना अकादमीचे अध्यक्ष मंदार रांजेकर म्हणाले, ‘‘लहान मुलांवर वेगवेगळ्या प्रकारे होणारा अन्याय-अत्याचार रांगोळीच्या माध्यमातून जगासमोर आणला जाणार आहे. घरांमध्ये आई-वडिलांकडून होणारी मारहाण, मुलींना दिला जाणारा दुजाभाव, बाल कामगारांवरील अन्याय, मुला-मुलींवरील लैंगिक अत्याचार अशा विविध विषयांवर प्रकाश टाकला जाणार आहे. लक्ष्मी रस्त्यावरील सर्व, ११ चौकांमध्ये या विषयांवर वेगवेगळी रांगोळी साकारण्यात येईल. त्यामध्ये मुला-मुलींच्या चित्रांसह सामाजिक संदेश असतील. महात्मा फुले मंडई येथील लोकमान्य टिळकांच्या पुतळ्यासमोरून सकाळी ८ वाजता उपेक्षित मुलांसाठी काम करणाऱ्या संस्थांचे प्रमुख तसेच सामाजिक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सुरुवात होईल.