कोल्हापूर जिल्ह्यात रंगपंचमीने घेतला तीन बालकांचा जीव, कुरुंदवाडमध्येही तरुणाचा बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 02:05 PM2021-04-02T14:05:11+5:302021-04-02T17:18:26+5:30
Rangpanchmi Kolhapur-रंगपंचमीने शुक्रवारी कोल्हापूर जिल्ह्यातील तीन कुटुंबांचा जगण्याचा रंग बेरंग करून टाकला. रंगपंचमी करून पोहायला गेल्यावर दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये एका मुलाचा बुडून मृत्यू झाला तर अन्य दोघे विहीरीच्या पाण्यात बुडाल्याची भिती व्यक्त होत आहे. तिघाही मुलांना पोहता येत नव्हते. दरम्यान, कुरुंदवाडमध्येही विहीरीत पोहण्यास गेलेल्या एका तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. यामुळे मृतांची संख्या एकूण चार झाली आहे.
कोल्हापूर : रंगपंचमीने शुक्रवारी कोल्हापूर जिल्ह्यातील तीन कुटुंबांचा जगण्याचा रंग बेरंग करून टाकला. रंगपंचमी करून पोहायला गेल्यावर दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये एका मुलाचा बुडून मृत्यू झाला तर अन्य दोघे विहीरीच्या पाण्यात बुडाल्याची भिती व्यक्त होत आहे. तिघाही मुलांना पोहता येत नव्हते. दरम्यान, कुरुंदवाडमध्येही विहीरीत पोहण्यास गेलेल्या एका तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. यामुळे मृतांची संख्या एकूण चार झाली आहे.
शिंगणापूर (ता.करवीर) येथील यशराज राजू माळी (वय १६ ) याचा गावातील खाणीत बुडून मृत्यू झाला. माळी कुटुंबिय मुळचे सातारा जिल्ह्यातील आहे. त्याच्या वडिलांच्या निधनानंतर आईने भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करून त्याला लहानाचा मोठा केला. सध्या तो दहावीत शिकत होता. सकाळी उठून मित्रासोबत रंगपंचमी साजरी केली. त्यानंतर तो आंघोळीसाठी गणेशनगर भागातील खाणीत गेला. त्याला पोहायला येत नव्हते. खाणीत उडी मारल्यावर ती कडेला पडल्याने तो गाळात रुतला व त्याकडे कुणाचे लक्ष न गेल्याने त्याचा गुदमरून मृत्यू झाला.
कोडोली (ता.पन्हाळा) येथील दोघे मुले विहिरीत बुडाल्याची भिती व्यक्त होत आहे. शिवराज कृष्णा साळोखे (वय १४ ) व शुभम लक्ष्मण पाथरवट (वय १४ रा. दोघेही कोडोली, ता.पन्हाळा) अशी त्यांची नांवे आहेत. रंगपंचमी खेळून झाल्यानंतर पाच-सहा मित्रांसोबत अकराच्या सुमारास ती वैभवनगर परिसरातील विहिरीत आंघोळीसाठी गेली होती. कपडे विहिरीच्या काठावर काढून ते कठड्यावरच बसले होते. परंतू त्यांचा तोल जावून ते विहिरीत कोसळले. या दोघांनाही पोहता येत नव्हते.
हे दोघे बुडाल्याचे पाहून अन्य शुभम पाथरवटचा भाऊ भितीने ओरडत गावात पळत आला.. त्यानंतर ग्रामस्थांनी शोध मोहिम राबवली परंतू दुपारपर्यंत ती मिळून आली नव्हती. अजूनही त्यांची शोध मोहिम सुरु आहे. शिवराज साळोखे नववीत शिकत होता. त्याचे वडिल शेतकरी असून त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह सुरु होता. शुभमची आई शिलाई मशिन चालवत त्याचे संगोपन करत होती. सामान्य गरिब कुटुंबातील या दोघांच्या मृत्यूने गावांवर शोककळा पसरली.