राणीबाग दर्शन महागणार; प्रस्ताव महासभेत अंतिम मंजुरीसाठी

By admin | Published: June 18, 2017 03:03 AM2017-06-18T03:03:47+5:302017-06-18T03:03:47+5:30

राणीबागेच्या शुल्कात प्रस्तावित वाढ कमी करण्याचा नुसता भास निर्माण करीत शिवसेनेने हा प्रस्ताव स्थायी समितीमध्ये मंजूर करून घेतला. त्यानंतर आता हा

Ranibag Darshan will rise; Proposal for final approval in the General Assembly | राणीबाग दर्शन महागणार; प्रस्ताव महासभेत अंतिम मंजुरीसाठी

राणीबाग दर्शन महागणार; प्रस्ताव महासभेत अंतिम मंजुरीसाठी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राणीबागेच्या शुल्कात प्रस्तावित वाढ कमी करण्याचा नुसता भास निर्माण करीत शिवसेनेने हा प्रस्ताव स्थायी समितीमध्ये मंजूर करून घेतला. त्यानंतर आता हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी महासभेच्या पटलावर आणण्यात आला आहे. मात्र भाजपाने आक्रमक भूमिका घेतल्याने महासभेत या विषयावर वादळी चर्चा होण्याचे संकेत आहेत.
राणीबागेचे प्रवेश शुल्क १९९६नंतर २००३मध्ये वाढवण्यात आले. मात्र त्यानंतरही मुलांसाठी प्रत्येकी दोन रुपये आणि प्रौढांसाठी प्रत्येकी पाच रुपये दर होते. पेंग्विन आणल्यानंतर राणीबागेत पर्यटकांची प्रचंड गर्दी होऊ लागल्याने दरवाढ करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. मात्र या प्रस्तावाला सर्वच स्तरातून विरोध सुरू झाला. याचा फायदा उठवत भाजपाने शिवसेनेला कोंडीत पकडण्याची तयारी केली होती. भाजपाचे संख्याबळ समान असल्याने हा प्रस्ताव फेटाळला गेल्यास नाचक्की होईल, याची शिवसेनेला धास्ती वाटू लागली. त्यामुळे दरवाढीवर फेरविचार करण्यास शिवसेनेने सुरुवात केली. त्यानुसार स्थायी समितीच्या बैठकीत दरवाढीचा प्रस्ताव सादर झाल्यानंतर शिवसेनेने दर कमी करण्याची उपसूचना मांडली. त्याप्रमाणे प्रौढांसाठी प्रत्येकी शंभर रुपये दर पन्नासवर आणण्यात आले. मात्र कुटुंबासाठी प्रवेश दर व राणीबागेत मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या नागरिकांकरिता सुचवण्यात आलेले प्रवेश शुल्क तेवढेच ठेवण्यात आले आहे. काँगे्रसच्या समर्थनाने शिवसेनेने हा प्रस्ताव स्थायी समितीमध्ये मंजूर करून घेतला. मात्र महासभेत या विषयावरून शिवसेना आणि भाजपात खडाजंगी होण्याची चिन्हे आहेत.

- पेंग्विन दाखल झाल्यापासून हजारो मुंबईकरांनी राणीबागेला भेट दिली असून, येथील सेल्फी पॉइंटसने बागेच्या सौंदर्यात आणखी भर घातली आहे.
मात्र राणीच्या बागेतील दरात वाढ झाली तर येथील गर्दी रोडावेल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. आणि असे असले तरी दरवाढीचा गर्दीवर परिणाम होणार नाही, असा दावा पालिकेने केला आहे.

पालिका महासभेची मंजुरी मिळाल्यास
१ जुलैपासून ही शुल्कवाढ लागू होणार आहे.
पेंग्विन आणल्यापासून दररोज १५ ते २० हजार पर्यटक राणीबागेत येतात. सुट्टीच्या दिवशी हा आकडा
35हजारांपर्यंत पोहोचतो,
असा पालिकेचा दावा आहे.

राणीबाग प्रवेश व पेंग्विन दर्शनासाठी एकत्रित शुल्क
- १२ वर्षांवरील व्यक्तींसाठी : १०० रुपयांऐवजी ५० रुपये
- ३ ते १२ वयोगटांतील मुलांसाठी : २५ रुपये
- कुटुंबासाठी : दोन प्रौढ व ३ ते १२ वर्षांपर्यंतची दोन मुले
: १०० रुपये
- अतिरिक्त प्रत्येक तीन वर्षांवरील मुलांसाठी २५
रुपये व १२ वर्षांवरील व्यक्तींसाठी शंभरऐवजी पन्नास रुपये.

विद्यार्थ्यांसाठी असे असेल शुल्क
- पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक
सहलीसाठी : नि:शुल्क
- खासगी शाळांतील ३ ते १२ वर्षांच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहलीसाठी : १५ रुपये
- खासगी शाळांतील १२ वर्षांवरील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहलीसाठी :
२५ रुपये

परदेशी पर्यटकांसाठी
१२ वर्षांवरील व्यक्तींसाठी : ४०० रुपये.
३ ते १२ वर्षांपर्यंतच्या व्यक्तींसाठी : २०० रुपये.

- सकाळी ६ ते ८पर्यंत चालण्यासाठी : मासिक १५० रुपये. संध्याकाळी ६ ते ८ या वेळेत फेरफटका बंद.
- ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांसाठी : नि:शुल्क
- फोटोग्राफी पेंग्विन कक्ष वगळता : १०० रुपये
- व्हिडीओ शूटिंग पेंग्विन कक्ष वगळता : ३०० रुपये

Web Title: Ranibag Darshan will rise; Proposal for final approval in the General Assembly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.