कौमार्य चाचणी केल्यास गुन्हा, बातम्यांची दखल घेणार : रणजित पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2018 04:06 AM2018-03-01T04:06:00+5:302018-03-01T04:06:00+5:30
जातपंचायतीच्या माध्यमातून कौमार्य चाचणी करणे तसेच त्याची जाहीर वाच्यता करणा-या व्यक्तीविरोधातही यापुढे गुन्हा नोंदविण्यात येईल, अशी घोषणा गृहराज्य मंत्री (शहरी) रणजित पाटील यांनी बुधवारी विधानपरिषदेत केली.
मुंबई : जातपंचायतीच्या माध्यमातून कौमार्य चाचणी करणे तसेच त्याची जाहीर वाच्यता करणा-या व्यक्तीविरोधातही यापुढे गुन्हा नोंदविण्यात येईल, अशी घोषणा गृहराज्य मंत्री (शहरी) रणजित पाटील यांनी बुधवारी विधानपरिषदेत केली. कौमार्य चाचणीसारख्या प्रथांविरोधात भूमिका घेणा-या युवकांच्या पाठी सरकार ठामपणे उभे असल्याची ग्वाहीसुद्धा त्यांनी यावेळी दिली.
शिवसेना आमदार नीलम गो-हे यांनी जातपंचायती आणि कौमार्य चाचणी आदी मुद्दयांवर लक्षवेधी सूचना मांडली. कौमार्य चाचणीमुळे महिलेच्या प्रतिष्ठेवर घाला येतो. जात पंचायतीचे पंच तसेच या प्रक्रियेत असलेल्या तसेच तपासात हस्तक्षेप करणा-या व्यक्तींविरूद्ध गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी गो-हे यांनी केली. कंजारभाट समाजातील जातपंचायतींनी स्वत:ची घटना आणि नियमावली तयार केली आहे. संविधानालाच आवाहन देण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप गो-हे यांनी केला.
यावेळी झालेल्या चर्चेला उत्तर देताना राज्यमंत्री पाटील म्हणाले की, जातपंचायत सदस्यांविरूद्ध तसेच अशा प्रकरणात हस्तक्षेप करणा-यांविरूद्ध फौजदारी गुन्हे दाखल केले जातील. अशा प्रथांच्या विरोधात आवाज उठविणा-या समाजातील सुशिक्षित तरूणांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे आहे.
जातपंचायतीच्या माध्यमातून दबाव टाकणा-या किंवा सामाजिक बहिष्कार कायद्याच्या उल्लंघन करणा-या घटनांबद्दल प्रसारमाध्यमात येणा-या बातम्यांची दखल घेऊन पोलिसांकडून ‘स्यू-मोटो’ दखल तात्काळ गुन्हा नोंदविण्यात येईल, असेही रणजित पाटील यांनी स्पष्ट केले.