“वीर सावरकरांना भारतरत्न देण्याबाबत कुटुंबीयांनी...”; रणजीत सावरकर स्पष्टच बोलले
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2024 08:15 PM2024-02-22T20:15:07+5:302024-02-22T20:15:13+5:30
Veer Savarkar News: वीर सावरकरांना भारतरत्न द्यावा, अशी मागणी सातत्याने केली जात आहे.
Veer Savarkar News: केंद्र सरकारने अलीकडेच भारतरत्न पुरस्कारांविषयी मोठी घोषणा केली. भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी, पी. व्ही. नरसिंहराव, चौधरी चरणसिंह, एम. एस. स्वामिनाथन आणि कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न देणार असल्याचे केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आले. भारतरत्न पुरस्कारांची घोषणा झाल्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देण्याबाबत केंद्र सरकारला सवाल केला. यातच वीर सावरकरांचे नातू रणजीत सावरकर यांनी याबाबत भाष्य केले आहे.
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी रणजीत सावरकरांनी भेट घेतली. सध्याचे सरकार हे वीर सावरकरांच्या विचारावर चालणारे सरकार आहे. वीर सावरकर यांचे विचार घेऊन पुढे जातील त्यांच्या मागे आम्ही उभे राहू. यापुढे देशाचे धोरण असेल, ते अधिकाधिक भारत चांगला व्हावा, सुदृढ व्हावा, समृद्ध व्हावा, सक्षम व्हावा, हे वीर सावरकरांचे जे विचार आहेत, ते अमलात आणण्यासाठी सरकार कटिबद्ध असेल, अशी चर्चा झाल्याची माहिती रणजीत सावरकर यांनी दिली. यानंतर वीर सावरकरांना भारतरत्न देण्याच्या मागणीसंदर्भात रणजीत सावरकर यांना विचारणा करण्यात आली.
वीर सावरकरांना भारतरत्न देण्याबाबत कुटुंबीयांनी...
यावर बोलताना रणजीत सावरकर म्हणाले की, वीर सावरकरांना भारतरत्न मिळावे, अशी मागणी सावरकर कुटुंबीयांची कधी नव्हती. स्वातंत्र्यवीर आणि हिंदूहृदयसम्राट या दोन पदव्या ज्या भारतीय जनतेने त्यांना दिल्या आहेत त्याच आम्ही महत्त्वाच्या मानतो. त्यामुळे या संबंधी आम्ही चर्चा केली नाही आणि करणारही नाही, असे रणजीत सावरकर यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.
दरम्यान, काही वर्षांपूर्वी प्रणब मुखर्जींना भारतरत्न सन्मान घोषित करून, केंद्रातील भारतीय जनता पक्ष प्रणित सरकारने राजकीय औदार्य दाखवलेच आहे तर मग हेच औदार्य त्यांनी हिंदूहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे ह्यांना देखील भारतरत्न घोषित करून दाखवायलाच हवे. देशातील प्रख्यात व्यंगचित्रकार आणि देशभरातील तमाम हिंदूंची अस्मिता जागृत करणाऱ्या अद्वितीय नेत्याला हा सन्मान मिळायलाच हवा. बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा ज्यांच्याकडे आलाय अशा माझ्यासारख्या अनेकांसाठी तो अत्यानंदाचा क्षण असेल, अशी एक पोस्ट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक्सवर लिहिली होती.