रणजितसिंह चुंगडे व जस्सीचा जामीन अर्ज फेटाळला
By admin | Published: July 23, 2016 01:56 AM2016-07-23T01:56:06+5:302016-07-23T01:56:06+5:30
किशोर खत्री हत्याकांड प्रकरण; नागपूर खंडपीठाचा निर्णय.
अकोला: शहरातील प्रसिद्ध व्यावसायी तसेच उद्योजक किशोर खत्री हत्याकांड प्रकरणातील आरोपी रणजितसिंह चुंगडे व निलंबित पोलीस कर्मचारी जस्सी ऊर्फ जसवंत सिंह या दोघांचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी फेटाळला. जिल्हा व सत्र न्यायालयाने या दोघांचा जामीन अर्ज यापूर्वीच फेटाळला असून त्यानंतर आता नागपूर खंडपीठानेही आरोपींना जामीन नाकारला. खोलेश्वर परिसरात निर्माणाधीन असलेल्या बालाजी मॉलच्या आर्थिक देवाण-घेवाणीतून किशोर खत्री यांची सोमठाणा शेत शिवारामध्ये ३ नोव्हेंबर रोजी बंदुकीच्या गोळय़ा झाडून व धारदार शस्त्रांनी हत्या करण्यात आली होती. किशोर खत्री यांचे बंधू दिलीप खत्री यांनी जुने शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी रणजितसिंह चुंगडे, पोलीस कर्मचारी जस्सी ऊर्फ जसवंत सिंह चौहान, अंकुश चंदेल व राजू मेहेर यांच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. यामधील रणजितसिंह चुंगडे व पोलीस कर्मचारी जस्सी ऊर्फ जसवंत सिंह चौहान या दोघांनी जामीन मिळविण्यासाठी जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज केला होता; मात्र न्यायालयाने या दोघांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता; परंतु न्यायालयाला सुटी असल्याने या अर्जावरील सुनावणी लांबली. शुक्रवारी नागपूर खंडपीठात या दोन्ही आरोपींच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली असून न्यायालयाने आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला. त्यामुळे रणजितसिंह चुंगडे व जस्सी या दोघांचा कारागृहातील मुक्काम लांबला आहे. या प्रकरणी सरकार पक्षातर्फे अँड. संग्राम शिरपूरकर आणि अँड. मुन्ना खान यांनी कामकाज पाहिले.