रावसाहेब दानवेंच्या मुलाचा शाही विवाहसोहळा
By Admin | Published: March 3, 2017 09:45 AM2017-03-03T09:45:53+5:302017-03-03T10:09:42+5:30
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या मुलगा संतोष दानवे यांच्या शाही विवाहसोहळ्याची जोरदार चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे.
ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. 3 - भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या मुलगा संतोष दानवे यांच्या शाही विवाहसोहळ्याची जोरदार चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे. या शाहीविवाहसोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासहीत अनेक दिग्गज उपस्थित होते. दानवेंनी मुलाच्या लग्नासाठी बीड बायपास रोडजवळील जवळपास 5 ते 6 एकर जमिनीवर अलिशान शामियाना उभारला होता. विशेष म्हणजे हा शामियाना उभारण्यासाठी राजस्थानमधील कारागिरांना बोलावण्यात आले होते.
या लग्नात जवळपास 1 ते 1.50 लाख लोकांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. शिवाय, पाहुण्यांसाठी 30 ते 40 प्रकारचे पदार्थही बनवण्यात आले होते. भाजपाचे प्रवक्ते शिरीष बोरवळकर यांनी सांगितले की, विवाहसोहळ्यात जवळपास 30 हजारहून अधिक लोकं सहभागी झाले होते.
या शाही विवाहसोहळ्यातील पाहुण्यांच्या यादीत राज्यातील व्हीव्हीआयपी, सरकारी अधिका-यांपासून ते औरंगबाद-जालना जिल्ह्यातील लोकांचाही सहभाग होता. या लग्नासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तैनात करण्यात आलेले पोलीस पथक ड्रोनच्या सहाय्याने लग्नस्थळावर नजर ठेऊन होते.
दरम्यान, दानवे यांच्या मुलाच्या शाही विवाहसोहळ्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. लग्नासाठी झालेल्या खर्चावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. जवळपास 5 ते 7 कोटी रुपये इतका खर्च झाल्याची माहिती समोर येत आहे. जालना शहरात लोकांना पिण्यासाठी पाणी मिळत नसताना या लग्नासाठी दोन दिवसात 400 ते 500 टँकर पाणी रस्त्यांवर फवारण्यासाठी वापरण्यात आल्याचेही बोलले जात आहे.
दरम्यान, या लग्नाकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासहीत पक्षातील बड्या नेत्यांनी पाठ फिरवली. केवळ शिवसेनेचे दोन स्थानिक नेत्यांनी लग्नात हजेरी लावली.