"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2024 05:22 PM2024-11-26T17:22:12+5:302024-11-26T17:29:13+5:30

महायुती सरकारचा शपथविधी कधी पार पडणार असल्याची माहिती भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी दिली

Raosaheb Danve informed when the oath taking ceremony of the Mahayuti government will take place | "३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला

"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला

Maharashtra Assembly Election Result : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. एकटा भाजप पक्षच १३२ जागा मिळत राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. दुसरीकडे विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन तीन दिवस उलटले तर महायुतीकडून मुख्यमंत्री पदाचे नाव निश्चित झालेलं नाही. महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले असतानी मुख्यमंत्री कोण होणार यावर निर्णय झालेला नाही. शिवसेना शिंदे गटाकडून एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची मागणी केली जात आहे. मात्र, भाजपकडून मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांचे नाव निश्चित झाल्याचे म्हटलं जात आहे. अशातच माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी मुख्यमंत्री पदाबाबत महत्त्वाचं विधान केलं आहे.

महायुतीच्या मुख्यमंत्री पदासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत नाव निश्चित होईल आणि त्यानंतर डिसेंबरमध्ये शपथविधी होईल, अशी माहिती माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी टीव्ही ९ मराठीशी बोलताना दिली आहे. रावसाहेब दानवे हे दिल्लीत होते. यावेळी त्यांनी पक्षश्रेष्ठींची भेट घेतली. त्यानंतर बोलताना मुख्यमंत्री ठरवण्याची जबाबदारी एकट्याची नाही. यावर तिनही पक्षांचे नेते चर्चा करतील, असे दानवेंनी म्हटलं आहे. तसेच एकनाथ शिंदे महायुतीत नाराज नसल्याचेही स्पष्टीकरण रावसाहेब दानवेंनी दिलं आहे. 

"मुख्यमंत्रीपद आणि शपथविधीचे घोडे कुठेही अडलेले नाही. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र निवडणूक लढले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचा गटनेता निवडला गेला, लवकरच भाजपचा गटनेता निवडला जाईल, यानंतर तीनही पक्षांचे नेते एकत्र बसून पक्षश्रेष्ठींकडे आमदारांचे म्हणणे मांडतील, ते देतील तो निर्णय मान्य असेल," असं  रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे.

"भाजपसह इतर पक्षांचे नेते आणि कार्यकर्त्यांना आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा, असे वाटत आहे. आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री का होऊ नये, अशी प्रत्येक पक्षाची भावना असते, त्यामुळे सर्वजण मागणी करत आहेत. परंतु, सगळेजण एकत्र बसून चर्चा करत नाही, तोपर्यंत मुख्यमंत्री ठरवण्याची जबाबदारी एकट्याची नाही, यावर सामूहिक चर्चा होईल. ३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदासाठीचे नाव निश्चित होईल आणि डिसेंबरमध्ये शपथविधी होईल," असं  रावसाहेब दानवेंनी स्पष्ट केलं.

"एकनाथ शिंदे हे महायुतीत नाराज नाहीत. ते नाराज असल्याच्या फक्त चर्चा आहेत. तसेच मुख्यमंत्रीपदाचा आणि मंत्रिपदाचा फॉर्म्युला एकत्रित बसून ठरवला जाईल," असं स्पष्टीकरण रावसाहेब दानवेंनी दिलं.
 

Web Title: Raosaheb Danve informed when the oath taking ceremony of the Mahayuti government will take place

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.