VIDEO: दानवेंचा दमदारपणा! जलआक्रोश मोर्चात गर्दीला आवरण्यासाठी स्वत: उतरले अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2022 11:40 PM2022-05-23T23:40:48+5:302022-05-23T23:44:18+5:30
औरंगाबादमधील धगधगत्या पाणी प्रश्नावर भाजपाच्या वतीनं आज जलआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महापालिकेवर धकड मोर्चा यावेळी काढण्यात आला.
औरंगाबादमधील धगधगत्या पाणी प्रश्नावर भाजपाच्या वतीनं आज जलआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महापालिकेवर धकड मोर्चा यावेळी काढण्यात आला. मोर्चात हजारोंची गर्दी पाहायला मिळाली. फडणवीसांनी औरंगाबादमधील पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावरुन ठाकरे सरकारला धारेवर धरलं. या मोर्चात रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे देखील सहभागी झाले होते. त्यांनीही आपल्या छोटेखानी भाषणात ठाकरे सरकारला खडेबोल सुनावले. पण दानवेंनी या मोर्चात केलेल्या एका कृतीची देखील जोरदार चर्चा होऊ लागली आहे.
"यांचे मंत्री जेलात अन् मुख्यमंत्री घरात", रावसाहेब दानवेंचा मुख्यमंत्र्यांना टोला
त्याचं झालं असं की जलआक्रोश मोर्चात हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते. फडणवीस, दानवे आणि भाजपाचे प्रमुख नेते एका ओपन कारमधून मार्गस्थ होत होते. पण कारच्या समोरच कार्यकर्ते गर्दी करु लागल्यानं मोर्चा पुढे सरकत नव्हता. पोलीसही कार्यकर्त्यांना पुढे सरकण्याचं आवाहन करत होते. पण ते काही ऐकेनात. मग रावसाहेब दानवेच कारमधून खाली उतरले, हातात एक भाजपाचा झेंडा घेतला आणि झेंड्याच्या काठीनं गर्दीला कारच्या समोरुन दूर लोटू लागले. दानवेंच्या या दमदारपणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
VIDEO: जलआक्रोश मोर्चात गर्दीला आवरण्यासाठी रावसाहेब दानवे स्वत: उतरले अन् हाती झेंडा घऊन सर्वांना थोपवलं pic.twitter.com/WF1eLyygjn
— Lokmat (@lokmat) May 23, 2022
दानवेंचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल
सभेला संबोधित करताना रावसाहेब दानवेंनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारचे नवीन नामकरणही केले. आपल्या भाषणाच्या सुरुवातीला दानवे म्हणाले की, "पाणी मिळता का..?किती दिवसाला मिळतं..?" यावर लोकांनी आठ दिवसाला मिळतं, असे सांगितलं. त्यानंतर रावसाहेब दानवेंनी या सरकारचं नवं नाव 'जुम्मे के जुम्मे' सरकार ठेवलं. दानवे म्हणाले की, "हे सरकार अमर, अकबर आणि अँथनीचं सरकार आहे. हे सरकार कधीच सोबत बसत नाहीत, जनतेच्या हिताचा निर्णय घेत नाही. राज्यातला कोणता प्रश्नही सोडवत नाही. यांना जे जमत नाही, त्याचं खापर केंद्रावर फोडतात."
"हे तर जुम्मे के जुम्मे सरकार...", रावसाहेब दानवेंकडून सरकारचं नामकरण
"शहराचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न मोठा आहे. आमच्या सरकारच्या काळात समांतर पाणी पुरवठा योजना मान्य झाली होती. ही योजना यांच्या भानगडीमुळे बंद झाली. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना अतुल सावे, हरीभाऊ बागडे यांनी 1680 कोटीची पाणीपुरवठा योजना मंजूर करुन घेतली. सरकार बदलले, युती भाजप सेनेची होती आणि या लोकांनी दुसऱ्याशी संगनमत केलं. लोकांनी आम्हाला मतदान केलं, पण आमची मतं चोरीला गेली. चोर सापडला, पण चोराला शिक्षा आता सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात द्यायची आहे. याची सुनावणी तुमच्या दराबारात सुरू आहे," असंही दानवे म्हणाले.