खोतकरांसोबतचा वाद मिटता मिटेना; दानवे आज मातोश्रीवर जाणार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2019 09:15 AM2019-03-06T09:15:32+5:302019-03-06T09:20:17+5:30
शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याविरोधात शड्डू ठोकले आहेत. युती होण्याआधी दानवेंविरोधात लोकसभा लढण्याची घोषणा केली होती.
मुंबई : शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याविरोधात शड्डू ठोकले आहेत. युती होण्याआधी दानवेंविरोधात लोकसभा लढण्याची घोषणा केली होती. मात्र, युतीनंतर दानवेंनी सहकारमंत्री सुभाष देशमुखांसोबत खोतकरांच्या घरी जात वाद मिटविण्याचा प्रयत्न केला होता. या पार्श्वभूमीवर रावसाहेब दानवे आज मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची मनधरणी करण्याची शक्यता आहे. मात्र, दानवेंना गेल्या वेळी मातोश्रीबाहेर झालेला विरोध पाहता शिवसैनिकांची युतीनंतरची भूमिका पाहावी लागणार आहे.
जालन्याचे खासदार रावसाहेब दानवे यांनी गेल्या विधानसभेला युती तुटल्यानंतर शिवसेनेच्या नेतृत्वावर जहरी टीका केली होती. यामुळे नाराज झालेल्या आमदार खोतकरांनी दानवेंना लोकसभेला पराभूत करण्याचा विडा उचलला होता. युती झाली तरीही अपक्ष लढण्याची घोषणा त्यांनी केली होती. मात्र, युती झाल्याने खोतकरांचे मन वळविण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करत रावसाहेब दानवेंबरोबर सहकारमंत्री सुभाष देशमुख यांना सोमवारी पाठविले होते. यावेळी या तिघांची पाऊण तास बंद दाराआड चर्चा झाली.
यावेळी पत्रकारांशी बोलतांना सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितले की, खोतकर आणि दानवे यांच्यात तात्वीक मतभेद होते. परंतु, ते आता निवळले असून, मंगळवारी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत खोतकर, दानवे यांची चर्चा होणार असल्याचे ते म्हणाले होते. यानुसार खोतकरांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. मात्र, या बैठकीत तिढा न सुटल्याने रावसाहेब दानवे आज मातोश्रीवर जाणार आहेत.
अर्जुन खोतकर यांनी आपण अद्यापही मैदानात असल्याचे सांगून माझ्या संदर्भातील निर्णय पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हेच घेणार आहेत, त्यांनी घेतलेला निर्णय आपल्यासाठी अतिंम निर्णय राहणार असल्याचे सांगितले होते. मात्र, रावसाहेब दानवे यांनी गेल्या पाच वर्षांत शिवसेनेविरोधात केलेली वक्तव्ये पाहता काही महिन्यांपूर्वी भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या मातोश्री भेटीवेळी शिवसैनिकांनी कडवा विरोध केला होता. यामुळे दानवे आणि मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांना रस्त्यातूनच माघारी जावे लागले होते. या पार्श्वभुमीवर आज दानवेंबाबत शिवसैनिक कोणती भूमिका घेतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
वादाचा इतिहास काय?
जालना बाजार समितीच्या निवडणुकीत संचालकपदाच्या जास्त जागा भाजपने मागितल्या होत्या. त्या देण्यावरून खोतकर आणि दानवे यांच्यात रस्सीखेच झाली होती. शेवटी तीन जागा शिवसेनेने भाजपला देतानाच खा. रावसाहेब दानवे यांचे चुलतबंधू भास्कर दानवे यांना उपसभापतीपद दिले. हा वाद मिटतो न मिटतो तोच २०१६ मध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या. त्यात भाजपला सर्वाधिक २२, तर शिवसेनेला १५ जागा मिळाल्या होत्या. त्यावेळी भाजपसोबत युती करून जिल्हा परिषद युतीच्या ताब्यात ठेवावी असा आग्रह दानवे यांनी धरला होता. तो फेटाळून लावत अर्जुन खोतकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसशी संधान साधून जिल्हा परिषदेत चुलत भाऊ अनिरुद्ध खोतकर यांना अध्यक्षपदी विराजमान केले. उपाध्यक्षपदही राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष सतीश टोपे यांच्याकडे दिल्याने दानवे आणि खोतकरांमधील दरी वाढत गेली. त्यातच लोकसभा निवडणुकीला एक वर्ष शिल्लक असतानाच खोतकर यांनी दानवे यांच्याशी दोन हात करण्याचा निर्णय जाहीर केल्यावर तर दानवे-खोतकर हा वाद आणखी गडद होत गेला.