'सध्या रावसाहेब दानवेच प्रदेशाध्यक्षपदी राहणार'
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2019 04:00 PM2019-06-01T16:00:00+5:302019-06-01T16:07:43+5:30
'भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष हे प्रदेशाध्यक्षपदाचा अंतिम निर्णय घेतील'
मुंबई : महाराष्ट्रातील भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे. त्यामुळे त्यांच्याजागी प्रदेशाध्यक्षपदाची धुरा कोण सांभाळणार, याबाबत सध्या राज्यात चर्चा सुरु आहे. प्रदेशाध्यपदासाठी चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, गिरीश महाजन यांच्या नावाची चर्चा जोरात आहे. दरम्यान, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष हे प्रदेशाध्यक्षपदाचा अंतिम निर्णय घेतील. त्यामुळे तूर्तास रावसाहेब दानवेच प्रदेशाध्यक्षपदी राहणार असल्याचे भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
चंद्रकांत पाटील यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना ही माहिती दिली. राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची सुद्धा गृहमंत्रीपदी नियुक्ती झाली आहे. त्यामुळे आधी राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा निर्णय घेण्यात येईल. त्यानंतर राज्यातील प्रदेशाध्यक्षपदाचा निर्णय घेण्यात येईल. त्यामुळे सध्या रावसाहेब दानवेच प्रदेशाध्यक्षपदी राहतील. या पदासाठी माझ्या नावाची सध्या चर्चा असली तरी अंतिम निर्णय हा राष्ट्रीय अध्यक्ष घेतील, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
याचबरोबर, लोकसभा निवडणुकीसंदर्भात बोलताना चंद्रकांत पाटील यांनी बारामतीचा अंदाज चुकल्याचे स्पष्ट केले. निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रातील जागांबाबत विश्वास होता, मात्र बारामतीचा अंदाज चुकला. मात्र शरद पवार घराण्याची दमछाक करण्यास आम्हाला यश आले, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
याशिवाय, राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराबाबत सध्या विचार सुरु आहे. याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील. तसेच, विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेसोबतचा असलेला जागावाटबाबतचा फॉर्म्युला बदलणार नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. देशाचे गृहमंत्री अमित शहा कोल्हापूरचे जावई आहेत. त्यांमुळे त्यांचे कोल्हापुरात जंगी स्वागत करणार असल्याचेही यावेळी चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.