भाजपा प्रदेशाध्यक्षपदी रावसाहेब दानवे

By admin | Published: January 7, 2015 02:35 AM2015-01-07T02:35:47+5:302015-01-07T02:35:47+5:30

: भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी रावसाहेब दानवे-पाटील यांची मंगळवारी नियुक्ती केली.

Raosaheb Danweed as BJP state president | भाजपा प्रदेशाध्यक्षपदी रावसाहेब दानवे

भाजपा प्रदेशाध्यक्षपदी रावसाहेब दानवे

Next

अमित शहा यांनी केली नियुक्ती : गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर मराठवाड्याला दहा वर्षांनी मान
मुंबई : भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी केंद्रीय अन्न व सार्वजनिक वितरण आणि ग्राहक व्यवहार खात्याचे राज्यमंत्री रावसाहेब दानवे-पाटील यांची मंगळवारी नियुक्ती केली. गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर मराठवाड्याला जवळपास १० वर्षांनी हे पद मिळाले आहे.
दानवे गडकरी गटाचे नेते मानले जातात. मुख्यमंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराज असलेल्या गडकरी गटाला प्रदेशाध्यक्ष पद देऊन खूश करण्याचा प्रयत्न केला आहे. शिवाय दानवे हे मराठा आहेत तर फडणवीस हे ब्राह्मण. दानवे मराठवाड्यातले तर फडणवीस विदर्भातले. त्यामुळे विभाग, जात या पातळीवर देखील समतोल साधण्याचा प्रयत्न पक्षाने केला आहे. मराठवाड्यात दानवे यांच्या निवडीने पंकजा मुंडे यांच्या वाढत्या नेतृत्वाला इशारा देण्याचाही प्रयत्न करण्यात आल्याचे बोलले जात आहे. दानवे केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा देतील, असे सांगितले जात आहे.
नवी नियुक्ती होण्यापूर्वी दानवे भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष होते. जालना लोकसभा मतदारसंघातून ते सलग चौथ्यांदा विजयी झाले आहेत. तत्पूर्वी ते दोन वेळा भोकरदन विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले होते. मूळचे शेतकरी असलेल्या दानवे यांना गावपातळीपासून राजकारणाचा, सहकार क्षेत्राचा व समाजकारणाचा दांडगा अनुभव आहे. मंगळवारी दानवे दिवसभर दिल्लीत अनेक नेत्यांच्या गाठीभेठीत  व्यस्त होते. जे.पी. नड्डा, नितीन गडकरी यांच्याही त्यांनी भेटी घेतल्या. या पदासाठी आशिष शेलार यांच्या नावाची जोरदार चर्चा होती. मात्र शेलार यांना मुंबई महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी मोकळे ठेवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. (विशेष प्रतिनिधी)


दानवे यांची राजकीय कारकिर्द
भारतीय जनता युवा मोर्चाचे जालना जिल्ह्णाचे अध्यक्ष हे रावसाहेब दानवे यांच्या राजकीय कारकिदीर्तील सुरुवातीचे पद होते. त्यांनी भोकरदन पंचायत समितीचे सभापती म्हणूनही काम केले. विधानसभा सदस्य व नंतर लोकसभा सदस्य म्हणून त्यांनी शेती व ग्रामविकासाशी संबंधित संसदीय समित्यांचे सदस्य म्हणून काम केले. भाजपा प्रदेश किसान मोर्चाचे ते उपाध्यक्ष होते. २०१४ च्या ऐतिहासिक लोकसभा निवडणुकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रीमंडळात ते केंद्रीय मंत्री आहेत.
भोकरदन तालुक्यातील रामेश्वर सहकारी साखर कारखाना, जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, भोकरदन खरेदीविक्री संघ, विठ्ठलराव अण्णा सहकारी ग्राहक संस्था, भोकरदन, मोरेश्वर सहकारी खरेदी विक्री संघ, भोकरदन, मोरेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ, राजूर, शिवाजी शिक्षण संस्था, जालना जिल्हा दूध संघटना, विवेकानंद शिक्षण संस्था तसेच छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती यांच्याशी ते संबंधित असून त्यापैकी बहुतेक संस्थांचे प्रमुखपद ते भूषवितात.
-मुळगाव जवखेडा ता. भोकरदन जिल्हा जालना.
-मूळ व्यवसाय शेती, जवखेडा मुळगावी संपूर्ण एकत्र कुटुंब.
-जालना लोकसभा मतदार संघ भाजपचा बालेकिल्ला बनवला.
-जनसामान्यांना जोडून ठेवणे, लोकसंग्रह मोठ्या प्रमाणात केला.
-कार्यकर्त्यांचे मोहोळ आपल्या मृदू भाषा शैलीतून जमवले.
-कायम समाधानी, हसतमुख व्यक्तिमत्व
-पक्षाने सोपवलेल्या जबाबदाऱ्या निष्ठेने पार पाडल्या.
-जवखेडा या गावचा भारतीय जनता पार्टी चे शाखा प्रमुख.
-भारतीय जनता पार्टी भोकरदन तालुका अध्यक्ष.
-भारतीय जनता पार्टी जालना जिल्हा अध्यक्ष.
-भारतीय जनता पार्टी प्रदेश सरचिटणीस महाराष्ट्र.
-प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र.
————-
लोकप्रतिनिधी म्हणून वाटचाल
-ग्रामपंचायत सदस्य
-पंचायत समिती सभापती,
-आमदार,खासदार, केंद्रीय राज्यमंत्री.
-राजकारण करतांना सामाजिक भान बाळगणारा नेता.
-अडवाणींची रथयात्रा आणि दिवंगत जेष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या संघर्ष यात्रेतून संपूर्ण महाराष्ट्रचा दौरा
-दिवंगत नेते प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्या सहवासात जडण घडण.
-दोन वेळा आमदार, सलग चौथ्या वेळा खासदार म्हणून काम.
-आत्तापर्यंतच्या २३ निवडणुकांपैकी २२ निवडणुका जिंकल्या.

Web Title: Raosaheb Danweed as BJP state president

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.