निवडणुकीपूर्वीच खोतकर आणि माझ्यात सेटलमेंट ; रावसाहेब दानवेंचा गौप्यस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2019 10:54 AM2019-06-09T10:54:03+5:302019-06-09T10:54:22+5:30
लोकसभा निवडणुकीपूर्वी जालना लोकसभा मतदार संघातील रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर यांच्यातील वाद मोठा चर्चेचा विषय बनला होता.
जालना - आपल्या वक्तव्यांनी नेहमीत चर्चेत राहणारे भाजप प्रदेशाध्यक्ष आणि खासदार रावसाहेब दानवे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर आणि माझ्यात निवडणुकीच्या दोन महिने आधीच सेटलमेंट झाली होती. नंतर जे काही सुरु होतं ते फक्त नाटकं होते, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी केला. जालन्यातील जाहीर सत्काराच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
लोकसभा निवडणुकीपूर्वी जालना लोकसभा मतदार संघातील रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर यांच्यातील वाद मोठा चर्चेचा विषय बनला होता. अखेर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मध्यस्थीनंतर हा वाद मिटला होता. मात्र हा वाद फक्त देखावा असल्याचा गौप्यस्फोट दानवे यांनी केला आहे. अर्जुन खोतकर यांनी जे केलं ते फक्त नाटकं होते. आमच्यात निवडणुकीच्या दोन महिने आधीच सेटलमेंट झाली होती, असा मोठा खुलासा रावसाहेब दानवे यांनी केला. विशेष म्हणजे हा गौप्यस्फोट केला तेव्हा अर्जुन खोतकरही व्यासपीठावर हजर होते.
तर यावेळी, रावसाहेब दानवे यांच्या हाताला यश असून त्यांनी आतापर्यंत सगळ्या निवडणुका जिंकल्यात, त्यामुळे विधानसभेतही रावसाहेब दानवेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष राहू द्या अशी विनंती भाजपाध्यक्ष अमित शाहांकडे करणार असल्याचं अर्जुन खोतकर यांनी म्हंटलंय.