बलात्कारातील आरोपीला सात महिन्यांनी अटक
By admin | Published: June 9, 2017 02:20 AM2017-06-09T02:20:01+5:302017-06-09T02:20:01+5:30
पाच आरोपींना अटक केल्यानंतर आता दिंडोशी पोलिसांनी सहावा फरारी आरोपी सनी ब्रह्मा बागडी याला सात महिन्यांनंतर काल अटक केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अल्पवयीन गतिमंद मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याच्या आरोपावरून पाच आरोपींना अटक केल्यानंतर आता दिंडोशी पोलिसांनी सहावा फरारी आरोपी सनी ब्रह्मा बागडी याला सात महिन्यांनंतर काल अटक केली. त्याला १२ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला. यातील सातवा आरोपी अद्याप फरार आहे.
मालाड (पूर्व) येथे राहणारी पीडित मुलीची आई घरकाम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवते. तिची १६ वर्षीय मतिमंद मुलगी २१ आॅक्टोबरपासून बेपत्ता झाली होती. शोध घेऊनही ती न सापडल्याने दुसऱ्या दिवशी दिंडोशी पोलीस ठाण्यात मिसिंग कम्लेंट दाखल करण्यात आली. सगळीकडे शोध सुरू असतानाच मालवणी येथील एका व्यक्तीने आपण त्या मुलीला दाणापाणी परिसरात फिरताना पाहिल्याचे सांगितले. २८ आॅक्टोबर रोजी मुलगी पालकांनाच दाणापाणी परिसरात फिरताना आढळली. वैद्यकीय तपासणीत ती गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले. मुलीकडे केलेल्या चौकशीत राहुल गेचंद, नितीन सारसर, नवीन सारसर, बॉबी गुस्सार आणि विजय गुस्सार यांनी बलात्कार केल्याचे निदर्शनास आल्याने दिंंडोशी पोलिसांनी त्यांना अटक केली. आरोपींनी मुलीला दाणापाणी येथे नेऊन सोडल्यानंतर ती सापडेपर्यंतच्या कालावधीत आरोपी दररोज रात्री रिक्षाने तेथे जाऊन तिला निर्जन ठिकाणी नेऊन बलात्कार करीत, असे तपासात आढळले. पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली.
११ जानेवारी रोजी पीडित मुलगी आपल्यासोबत दुकानात जात असताना एका मुलाला पाहून घाबरली. तिला विचारणा केली असता तिने त्या मुलाने तसेच त्याच्या मित्रानेही आपल्यावर मोकळ्या मैदानात तसेच एका कारमध्ये बलात्कार केल्याचे सांगितले. आपण त्याबाबत दिंडोशी पोलिसांना कळवले तरी पोलिसांनी त्यांचा आरोपींमध्ये समावेश करण्यास नकार दिला तसेच चिंचोली पुलाखाली पार्क केलेल्या कारची माहिती देऊनही ती कार जप्त केली नाही, अशी तक्रार मुलीच्या आईने निवेदनात केली आहे. पीडित मुलगी या बलात्कारातून गर्भवती झाल्यानंतर १७ आठवड्यांनंतर न्यायालयाच्या आदेशाने खासगी हॉस्पिटलमध्ये तिचा गर्भपात करण्यात आला. अटक आरोपींचे कुटुंबीय तक्रार मागे घेण्यासाठी धमकावत असल्याची तक्रार एका निवेदनाद्वारे पीडितेच्या आईने केली होती. या गुन्ह्याचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात यावा, असे निवेदन राष्ट्रीय भ्रष्टाचार आणि अपराध निवारक परिषदेचे अध्यक्ष मोहन कृष्णन यांनी राज्यपाल, मुख्यमंत्री आणि पोलीस आयुक्तांना दिले होते.