धावत्या रेल्वेत मुलीवर बलात्काराचा प्रयत्न
By admin | Published: August 4, 2014 12:48 AM2014-08-04T00:48:01+5:302014-08-04T00:48:01+5:30
मुंबई-नागपूरच्या प्रवासादरम्यान धावत्या दुरांतो एक्स्प्रेसमध्ये विद्यार्थिनीसोबत अतिप्रसंगाचा प्रयत्न झाला. रविवारी पहाटे पावणेपाच वाजता आधी अकोला, त्यानंतर अमरावती व नंतर नागपूर रेल्वे पोलिसांना
युवतीनेच दिली रेल्वे पोलिसांना माहिती : प्राध्यापकाविरूद्ध तक्रार नोंदविण्यास नकार
प्रसन्न दुचक्के - अमरावती
मुंबई-नागपूरच्या प्रवासादरम्यान धावत्या दुरांतो एक्स्प्रेसमध्ये विद्यार्थिनीसोबत अतिप्रसंगाचा प्रयत्न झाला. रविवारी पहाटे पावणेपाच वाजता आधी अकोला, त्यानंतर अमरावती व नंतर नागपूर रेल्वे पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. नागपूर रेल्वे पोलिसांनी याप्रकरणी अदखलपात्र गुन्हा नोंदवून अटक केली. चंद्रशेखर रामदास टेमढे (४५, रा. एसबीआय कॉलनी, वर्धा) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
मुंबई येथील एक २० वर्षीय तरुणी नागपूर येथे उच्च शिक्षण घेत आहे. शनिवारी सायंकाळी ७.२० वाजता ती दुरांतो एक्स्प्रेसने मुंबई येथून नागपूरकडे जाण्यासाठी निघाली होती. रेल्वेतील कोच क्रमांक एस-७ मधील बर्थ क्रमांक १५ वरून तिचा प्रवास सुरू होता. तिच्या समोरच्या म्हणजे १६ क्रमांकाच्या बर्थवर चंद्रशेखर टेमढे नामक इसम प्रवास करीत होता. रात्रीचा प्रवास असल्याने एकांताची संंधी साधून सहप्रवाशाने तरूणीसोबत असभ्य वर्तन सुरू केले. प्रवासादरम्यान हा प्रकार सुरूच होता. त्यानंतर त्याने युवतीची छेड काढून अतिप्रसंगाचा प्रयत्न केल्याची माहिती आहे.
युवतीने तत्काळ या प्रकरणाची माहिती रेल्वेतील तिकीट तपासणिसाला दिली. त्यानंतर या घटनेची माहिती अकोला व अमरावती रेल्वे पोलिसांना देण्यात आली. या दोन्ही स्थानकांवर आरोपीला अटक करण्यासाठी लगेच बंदोबस्तही तैनात करण्यात आला. मात्र, दुरांतो एक्स्प्रेस थेट नागपूरलाच थांबत असल्याने याची माहिती नागपूर रेल्वे पोलिसांना देण्यात आली. सकाळी ७ वाजता दुरांतो एक्स्प्रेस नागपूर स्थानकावर पोहोचताच पोलिसांनी आरोपी चंद्रशेखर टेमढे याला ताब्यात घेतले. त्याने तो वर्धा येथे प्राध्यापक असल्याची माहिती पोलिसांना दिली. युवतीने याप्रकरणी तक्रार नोंदविण्यास नकार दिल्याने नागपूर रेल्वे पोलिसांनी अखेर प्राध्यापकाविरूद्ध भादंविच्या कलम ११२, ११७ नुसार अदखलपात्र गुन्हा नोंदवून त्याला अटक केली. नंतर त्याची जामिनावर सुटका करण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.