दुसऱ्या मुलीशी लग्न केल्यानंतर पहिलीने ठोकली बलात्काराची केस
By admin | Published: April 16, 2017 08:17 PM2017-04-16T20:17:32+5:302017-04-16T20:17:32+5:30
पोलीस कर्मचारी सुधाकर लक्ष्मण इंगेवाड याच्यावर शनिवारी रात्री उशिरा शिवाजीनगर ठाण्यात बलात्काराचा गुन्हा नोंद झाला.
ऑनलाइन लोकमत
बीड, दि. 16 - लग्नाचे आमिष दाखवून दोन वर्षांपासून एका 26 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी पोलीस कर्मचारी सुधाकर लक्ष्मण इंगेवाड याच्यावर शनिवारी रात्री उशिरा शिवाजीनगर ठाण्यात बलात्काराचा गुन्हा नोंद झाला. पोलिसांच्या माहितीनुसार, सुधाकर इंगेवाड हा मूळचा नांदेडचा असून 2008 मध्ये पोलीस दलात भरती झाला. सध्या तो मुख्यालयावर कर्तव्यास आहे. दोन वर्षांपूर्वी त्याची नेमणूक चौसाळा (ता. बीड) येथे चौकीत होती. चौसाळा येथीलच 26 वर्षीय महिलेसोबत त्याची ओळख झाली. पुढे ओळखीेचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर इंगेवाडची बीडमध्ये पोलीस मुख्यालयात बदली झाली. लग्नाचे आमिष दाखवून इंगेवाड याने वारंवार बलात्कार केला, अशी फिर्याद महिलेने शनिवारी रात्री शिवाजीनगर पोलिसांत दिली. त्यानंतर त्याच्यावर उशिरा गुन्हा नोंद करण्यात आला. तो फरार असून तपास सहायक निरीक्षक सलीम पठाण करत आहेत. रक्षणकर्त्यानेच महिलेची अब्रू लुटल्याच्या या प्रकरणाने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
लिव्ह इन रिलेशनशिप
पीडित महिला घटस्फोटीत असून, तिला एक मुलगा आहे. चौसाळा हे तिचे माहेर आहे. तेथे सुधाकर इंगेवाडसोबत प्रेमसंबंध आल्यानंतर त्याची बदली झाली. त्यानंतर दोन वर्षांपासून ते दोघे बीडमध्ये शिवाजीनगर भागात भाड्याचे घर घेऊन लिव्ह इन रिलेशनशिपप्रमाणे लग्नाविनाच एकत्रित राहत होते. त्यांना सहा महिन्यांची मुलगी देखील आहे.
दुसरे लग्न केल्याने उडाले खटके
सुधाकर इंगेवाड याने लग्न करण्याचे आमिष दाखवून पीडित महिलेसोबत शारीरिक संबंध ठेवले. त्यांना मुलगी झाल्यानंतर पीडितेने लग्नाचा हट्ट धरला. मात्र सुधाकरने गावी जाऊन दुसऱ्याच मुलीशी लग्न केले. याची माहिती पीडितेला कळाल्यावर त्यांच्यात बेबनाव निर्माण झाला. अखेर महिलेने ठाणे गाठून फिर्याद नोंदवली.