नोकरीच्या शोधात आलेल्या तरुणीवर बलात्कार
By Admin | Published: March 18, 2017 05:49 AM2017-03-18T05:49:18+5:302017-03-18T05:49:18+5:30
नोकरी शोधण्यास मदत करण्याच्या बहाण्याने मित्रानेच २७ वर्षांच्या तरुणीवर मित्राच्या मदतीने बलात्कार केला. त्यांच्या तावडीतून सुटण्यासाठी तरुणीने पाच मजली इमारतीवरून उडी
मुंबई : नोकरी शोधण्यास मदत करण्याच्या बहाण्याने मित्रानेच २७ वर्षांच्या तरुणीवर मित्राच्या मदतीने बलात्कार केला. त्यांच्या तावडीतून सुटण्यासाठी तरुणीने पाच मजली इमारतीवरून उडी घेतल्याची धक्कादायक घटना पायधुनी परिसरात शुक्रवारी घडली. या प्रकरणी संतोष रामसागर कनोजिया (२६), फारुक अब्दुल लतीफ खान (३१) यांना अटक झाली आहे.
उत्तर प्रदेश येथील ही २७ वर्षीय तरुणी नोकरीच्या शोधात होती. याचवेळी गावाकडील मित्र संतोष कनोजिया याने तिला मुंबईत चांगल्या पगाराची नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखविले होते. गेल्या आठवड्यात ती कनोजियासोबत मुंबईत आली. मुंबईत स्वत:चे घर मिळेपर्यंत कनोजियाने तिला स्वत:च्या घरी राहण्यास सांगितले.
गुरुवारी रात्री संतोष या तरुणीला फारुक राहत असलेल्या गोदामामध्ये जेवणासाठी घेऊन आला. पायधुणी येथील झकेरिया रस्त्यावरील ‘सुरंगी मेन्शन’ या इमारतीच्या गच्चीवरील गोदामामध्ये फारुक राहतो. फारुकशी आपली ओळख असून, तो नोकरी मिळवून देण्यास मदत करेल, असे तिला सांगितल्यामुळे तरुणीने त्याच्यासोबत येण्यास होकार दिला होता. जेवणानंतर रात्र झाली असल्याने फारुकने त्यांना थांबण्याचा सल्ला दिल्यामुळे ते तेथेच थांबले.
पहाटे तीनच्या सुमारास या दोघांनी तिच्यावर बलात्कार केला. अखेर त्यांच्या तावडीतून सुटण्यासाठी तरुणीने पहाटे चारच्या सुमारास गच्चीवरून खाली उडी मारली. ती खाली पडल्याच्या आवाजाने आसपासचे लोक जमा झाले. घटनेची माहिती मिळताच पायधुनी पोलीस तेथे दाखल झाले. तरुणीला तत्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल केले. तिच्या जबाबावरून सामूहिक बलात्काराच्या गुन्ह्यात संतोष व फारुक या दोघांना अटक केल्याची माहिती पोलीस उपायुक्त ज्ञानेश्वर चव्हाण यांनी दिली. (प्रतिनिधी)
सुटकेसाठी गच्चीवरून मारली उडी
शुक्रवारी पहाटे तीनच्या सुमारास संतोष आणि फारुकने तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. तिने त्यांच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न केला. मात्र दोघेही तिच्यावर अत्याचार करत राहिले. अखेर त्यांच्या तावडीतून सुटण्यासाठी तरुणीने पहाटे चारच्या सुमारास गच्चीवरून खाली उडी मारली.