बलात्काराचा व्हिडीओ ‘व्हॉट्सअॅप’वर
By admin | Published: August 20, 2015 12:30 AM2015-08-20T00:30:52+5:302015-08-20T00:30:52+5:30
बलात्काराचा व्हिडीओ व्हॉट्सअॅपवर व्हायरल झाल्यानंतर बदनामीच्या भीतीने पीडित अल्पवयीन मुलीने विषारी द्रव प्राशन करून बुधवारी
उदगीर (जि.लातूर) : बलात्काराचा व्हिडीओ व्हॉट्सअॅपवर व्हायरल झाल्यानंतर बदनामीच्या भीतीने पीडित अल्पवयीन मुलीने विषारी द्रव प्राशन करून बुधवारी पहाटे आत्महत्येचा प्रयत्न केला़ तिची प्रकृती गंभीर असून, एका खासगी रुग्णालयात ती मृत्यूशी झुंज देत आहे़
देवणी तालुक्यातील पीडित अल्पवयीन मुलगी उदगीरच्या महाविद्यालयात अकरावीत शिक्षण घेत आहे. काही दिवसांपूर्वी तिला एकटीला गाठून एका युवकाने तिच्यावर बलात्कार केला़ त्याने बलात्काराचे चित्रीकरण करून ते सार्वजनिक करण्याची तिला धमकी दिली. बदनामीच्या भीतीने ती गप्प राहिली, परंतु व्हाट्सअॅपवर व्हिडीओ व्हायरल होऊन तो तिच्याच एका नातेवाइकाकडे आला. हा प्रकार समजल्यानंतर अत्याचारित मुलीने बुधवारी पहाटे घरी विषारी द्रव प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला़ तिच्या वडिलांच्या हा प्रकार लक्षात येताच त्यांनी तिला रुग्णालयात दाखल केले.
घटनेची माहिती मिळताच उदगीर पोलीस रुग्णालयात दाखल झाले़ पोलिसांनी संबंधित क्लिप असलेला नातेवाइकाकडील मोबाइल ताब्यात घेतला आहे. पीडित मुलगी जबाब नोंदविण्याच्या स्थितीत नसल्याचे अपर पोलीस अधीक्षक लता फड यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
व्हॉट्सअॅपवरील व्हिडीओमधून आरोपींची ओळख झाली असून, दोघांच्या तपासासाठी पोलिसांची पथके रवाना झाल्याचेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)