हॉटेल उद्योगात तेजी
By admin | Published: June 13, 2016 06:03 AM2016-06-13T06:03:01+5:302016-06-13T06:03:01+5:30
भारतीय अर्थव्यवस्थेत येत असलेल्या सुधाराचे पडसाद भारतीय हॉटेल उद्योगातही सकारात्मकरीत्या उमटताना दिसत असून
मुंबई : भारतीय अर्थव्यवस्थेत येत असलेल्या सुधाराचे पडसाद भारतीय हॉटेल उद्योगातही सकारात्मकरीत्या उमटताना दिसत असून, देशातील विविध श्रेणींच्या हॉटेलमधील व्यवसायात गेल्या दोन वर्षांत २२ टक्क्यांची सातत्यपूर्ण वाढ नोंदली गेली. विशेष म्हणजे पडवणाऱ्या दरांसोबत पंचतारांकित हॉटेल्समधील बुकिंगलाही मोठ्या प्रमाणावर मागणी वाढत असल्याचे दिसून आले आहे.
हॉटेल उद्योगाशी संबंधित सर्वेक्षण संस्थेने या उद्योगातील आगामी वर्षाच्या कारकिर्दीबाबत केलेल्या अहवालातून रंजक माहिती पुढे आली आहे. पर्यटन उद्योगाचे मूलभूत घटक मानल्या जाणाऱ्या वाहतुकीच्या सेवा देणाऱ्या कंपन्या आणि हॉटेल्स कंपन्या यांच्या व्यवसायातही वाढ होताना दिसत आहे. भारतात थ्री स्टार आणि त्यावरील हॉटेलांची संख्या १,२०० पेक्षा जास्त असून, तारांकित खोल्यांची संख्या आता साडेसात हजारांच्या वर गेली आहे. पंचतारांकित हॉटेलच्या सेवेत असलेल्या कंपन्यांतर्फे आगामी पाच वर्षांत देशभरात सुमारे ३५० नव्या हॉटेलची निर्मिती होणार असून, या माध्यमातून आणखी किमान दोन हजार तारांकित खोल्या उपलब्ध होतील. गेल्या पाच वर्षांपासून भारतीय हॉटेल कंपन्यांनी आपल्या कार्यपद्धतीमध्ये आमूलाग्र बदल केला असून, बहुतांश कंपन्यांनी ई-कॉमर्सच्या माध्यमातून ग्राहकापर्यंत पोहोचण्याच्या सेवा सुरू केल्या आहेत. आतापर्यंत लोक शाळांच्या सुट्यांच्या काळात पर्यटनासाठी बाहेर पडत असत. त्यामुळे विशिष्ट कालावधीत पर्यटन हंगाम असे. परंतु विमान आणि हॉटेल अशा दोन्ही क्षेत्रांतील कंपन्यांनी सरत्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केल्यानंतर व्यवसायाला
गती देण्यासाठी या कंपन्यांनी सुटीच्या कालावधीसोबत वर्षभर सतत नवनव्या आॅफर्स ग्राहकांना देऊ केल्या आहेत.
पर्यटनाच्या ई-कॉमर्स सेवा
पर्यटन क्षेत्रातही ई-कॉमर्स कंपन्यांनी प्रवेश केला आहे. रेल्वे, विमान, बससेवांचे आगाऊ बुकिंग करण्याच्या सुुविधेसोबतच ग्राहकांना हॉटेलचे देखील बुकिंग करण्याची सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या वेबसाइटच्या माध्यमातून ग्राहकांना स्वत:च्या प्रवासाचे पूर्ण नियोजन करणे देखील शक्य होते.
>पर्यटनाचा पॅटर्नच पूर्णपणे बदलला
सुटीच्या किंवा पर्यटनाचा हंगाम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कालावधीऐवजीही ग्राहकांना विमान आणि हॉटेल कंपन्यांनी घसघशीत सूट योजना घोषित केल्यामुळे ग्राहकांनीही या ‘आॅफ सीझन’ योजनांना प्रतिसाद देण्यास सुरुवात केली आहे. परिणामी, पर्यटनाचा पॅटर्नच पूर्णपणे बदलला आहे. ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आता विमान आणि हॉटेल कंपन्यांनी एकमेकांशी करारबद्ध होण्याच्या प्रकारांतही झपाट्याने वाढ होत असल्याची माहिती या उद्योगाचे अभ्यासक सॅम्युअल परेरा यांनी दिली.
पंचतारांकित हॉटेल सेवाही अडीच हजारांत : पर्यटनाचा हंगाम वगळता अनेक पंचतारांकित हॉटेल कंपन्या आपल्या व्यवसायवृद्धीसाठी विविध आॅफर्सचा मारा करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे नामांकित हॉटेल्समधून आॅफ सीझनध्ये हॉटेलच्या खोल्याचे दर अडीच हजारांपर्यंत खाली येताना दिसत आहे. त्यामुळे अनेकांना विमान प्रवासाप्रमाणेच तारांकित हॉटेल्समध्ये राहण्याची इच्छाही पूर्ण करण्याची संधी मिळत आहे.