यावल अभयारण्यात आढळते दुर्मीळ उंदरी हरीण
By admin | Published: October 6, 2014 10:44 AM2014-10-06T10:44:40+5:302014-10-06T10:44:40+5:30
उंदीर वा 'पिसोरी' हरीण ज्याला इंग्रजीत 'इंडियन स्पॉटेड चेव्हरोटेन' म्हटले जाते. ते जळगाव जिल्ह्यात क्वचित आढळणारे अतिदुर्मीळ हरीण आहे.
Next
अभय उजागरे■ जळगाव
उंदीर वा 'पिसोरी' हरीण ज्याला इंग्रजीत 'इंडियन स्पॉटेड चेव्हरोटेन' म्हटले जाते. ते जळगाव जिल्ह्यात क्वचित आढळणारे अतिदुर्मीळ हरीण आहे. 'यावल वन्यजीव अभयारण्य' तसेच 'यावल वनविभागाचे राखीव जंगलात' आतापर्यंत विन बेग हे हरीण बघितले आहे. महाराष्ट्रातील 'मेळघाट व्याघ्र प्रकल्प' तसेच 'ताडोबा व्याघ्र प्रकल्पातही' हे हरीण अधूनमधून दिसते. इतर हरिणांच्या तुलनेत 'पिसोरी हरीण' खूपच वैशिष्ट्यपूर्ण आहे. याच्या लहानग्या आकारामुळे तसेच शारीरिक रचनेमुळे याला उंदरासारखे हरीण असे म्हटले जाते.
नाकापासून याच्या शरीराची लांबी साधारणपणे पावणेदोन ते दोन फूट असते. तर खांद्यापर्यंत उंची एक फूटपर्यंत असते आणि वजन चार किलोपर्यंत असते. याच्या कातडीचा रंग तपकिरी काळसर असून अंगावर पांढरे वा पिवळसर धब्बे असतात विशेषत: पोटाच्या वरच्या भागात, शरीराचा खालील भाग पांढुरक्या रंगाचा असतो. याच्या जबड्यात ३0 दात असून जबड्याच्या वरच्या भागात पुढे दात नसून नरांना दोन लांब सुळे असतात. याचे पायाचे खूर पण चार भागात दुभंगलेले असून बाहेरील दोन भाग छोटे असतात. पाय लांबुळके असून मागचे पाय थोडे उंच असतात.
हे हरीण निशाचर असून सूर्यास्ताच्या सुमारास वा सूर्योदयाआधी थोडा वेळ वावरत असते. वृक्ष आच्छादन असलेल्या खडकाळ भागात हे हरीण वस्ती करते. विशेषत: मोठे दगड वा शिळ असलेल्या भूभागात. नर शक्यतो एकटे राहतात. मात्र विणीच्या काळात मादी सोबत असते. हे हरीण खूप सावध असून थोडीही चाहूल लागताच झाडीत वा लपणात दिसेनासे होते.
---------------------
१९९३ साली मे महिन्यात 'व्याघ्र गणनेच्या' कालावधीत मी व माझ्या बरोबर सोनवणे हे वनरक्षक आम्ही दोघांनी 'लंगडा आंबा' वन विश्रामगृहाच्या दक्षिणेकडील रस्त्याजवळील जंगलात 'उंदरी हरण' बराच काळ बघितले; मात्र आमची चाहूल लागताच ते एका झुकलेल्या झाडावर चढले. चांगले १२ ते १५ फूट आणि झाडीत उडी मारून पळाले. संध्याकाळी पावणेसात वाजले होते.
उंदरी हरिणाला जंगलात वावरताना बघणे हा एक अद्भुत अनुभव असतो. त्यासाठी सिकंदर नशीब पाहिजे असे आदिवासी बांधव सांगतात. माझे नशीब नक्कीच चांगले आहे; कारण मी १९७९ सालापासून आतापर्यंत तीन वेळा 'उंदरी हरीण' बघितले आहे. मनुदेवीजवळ एका स्वयंसेवी संस्थेच्या काही सदस्यांनी 'उंदरी हरीण' बघितल्याची नोंद केली आहे.