‘रेरा’कडे आतापर्यंत १६ प्रकल्पांचीच नोंदणी
By admin | Published: May 28, 2017 01:42 AM2017-05-28T01:42:22+5:302017-05-28T01:42:22+5:30
बांधकाम व्यावसायिकांकडून ग्राहकांना वेळेत व दिलेल्या आश्वासनानुसार, घरे मिळावीत, यासाठी ‘रेरा’ कायद्याची स्थापना झाली असून, राज्यात २५ ते ३० हजार गृहनिर्माण
- लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : बांधकाम व्यावसायिकांकडून ग्राहकांना वेळेत व दिलेल्या आश्वासनानुसार, घरे मिळावीत, यासाठी ‘रेरा’ कायद्याची स्थापना झाली असून, राज्यात २५ ते ३० हजार गृहनिर्माण प्रकल्प सुरू झालेले असताना, आतापर्यंत केवळ १६ प्रकल्पांचीच नोंदणी झाल्याची माहिती ‘रेरा’चे नियंत्रक गौतम चॅटर्जी यांनी दिली.
आतापर्यंत मुंबई, नवी मुंबई, पुणे येथे ‘महारेरा’ कायद्यासंदर्भात मार्गदर्शनासाठी कार्यशाळा घेण्यात आल्या. हा कायदा चांगले काम करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांसाठी एक व्यासपीठ असून, चुकीचे काम करणाऱ्यांना शिक्षा करणारा असल्याचे चॅटर्जी यांनी सांगितले.
कोकण व पुणे विभागामार्फत १६ प्रकल्पांची, तसेच ९०० एजंटांनीही नोंदणी केल्याचे त्यांनी सांगितले. तीन महिन्यांचा अवधी आहे, म्हणून अगदी शेवटच्या दिवसापर्यंत नोंदणी करण्याची मानसिकता बांधकाम व्यावसायिकांनी बाळगू नये. जूनअखेर एकूण गृहनिर्माण प्रकल्पांच्या १५ ते २० टक्के प्रकल्पांची आॅनलाइन नोंदणी झाली पाहिजे, असे ते म्हणाले.
महाराष्ट्र अव्वल-कटारिया
महाराष्ट्रात सर्वप्रथम या कायद्याची अंमलबजावणी व कार्यालयाची स्थापना, तसेच आॅनलाइन रजिस्ट्रेशन सुरू झाल्याची माहिती क्रेडाईचे राज्य अध्यक्ष शांतीलाल कटारिया यांनी दिली.