खगोलप्रेमींनी अनुभवले एकत्रित सूर्य-चंद्रबिंबाचे दुर्मीळ दर्शन
By admin | Published: February 11, 2017 01:04 AM2017-02-11T01:04:33+5:302017-02-11T01:04:33+5:30
नव्याच्या पौर्णिमेला पन्हाळा, मसाई पठारावर अवकाश निरीक्षकांची गर्दी; शुक्र अन् मंगळ ग्रहांची दिसली स्पष्ट छटा
संदीप आडनाईक ---कोल्हापूर --नव्याच्या पौर्णिमेला म्हणजे माघी पौर्णिमेला शुक्रवारी सायंकाळी अवकाश निरीक्षकांनी आणि खगोलप्रेमींनी लालभडक सूर्य आणि चंद्रबिंबाचे एकाच वेळेस दर्शन घेण्याची दुर्मीळ संधी अनुभवली. पन्हाळा आणि मसाई पठारासारख्या उंचावरील जागेवर ही अनोखी वैज्ञानिक जादू पाहण्यासाठी शौकिनांनी गर्दी केली.
‘लोकमत’च्या टीमने कोल्हापूरपासून ३० किलोमीटर अंतरावरील पन्हाळ्याजवळील मसाई पठारावर या अनोख्या दर्शनाचा अनुभव घेतला. यावेळी मसाई पठाराच्या पश्चिम क्षितिजावर अगदी अल्पकाळ लालसर मोठे सूर्यबिंब आणि पूर्व क्षितिजावर तितकेच मोठे आणि लालसर चंद्रबिंब पाहण्याची सुवर्णसंधी मिळाली. ठीक सहा वाजता चंद्रोदय झाला; पण धुक्याच्या दुलईमुळे अगदी सूर्यास्त होण्याच्या आधी एक-दोन मिनिटांनी म्हणजे सहा वाजून ११ मिनिटांनी चंद्र क्षितिजावर पूर्णरूपात अवतरला आणि हे अनोखे आणि विहंगम दृश्य खगोलप्रेमींना अनुभवायला मिळाले.
विशेष म्हणजे या माघ पौर्णिमेला सूर्यास्त आणि चंद्र्रोदय एकाच क्षितिजरेषेवर पाहायला मिळाले. याशिवाय अवकाशात शुक्र आणि मंगळ हे दोन्ही ग्रहही डोळ्यांनी अतिशय स्वच्छ आणि स्पष्टपणे दिसले. ‘दूरसंचार’चे निवृत्त अधिकारी वसंतराव घोरपडे, विभागीय अभियंता व्ही. एस. कालुगडे, एस. एस. मुरगे, ए. बी. चौगुले, एम. एम. पुजारी, एस. पी. चव्हाण तसेच रोहित कांबळे, मगदूम यांच्यासारख्या स्थानिकांनीही मसाई पठारावर हा अनुभव घेण्यासाठी ठाण मांडले होते.
हौशी छायाचित्रकारांनीही ही संधी सोडली नाही. केआयटी कॉलेजचे प्रा. विवेक देसाई, प्रा. विदुला स्वामी तसेच शिवाजी विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. व्ही. जे. फुलारी आणि पीएच.डी.चे विद्यार्थी अविराज जत्राटकर, हौशी छायाचित्रकार सुनील साखरे यांनी पन्हाळ्यातील पुसाटी पॉइंटवरून हे दृश्य टिपले.
सूर्य, पृथ्वी आणि चंद्र सरळ रेषेत
पन्हाळ्यावरील पुसाटी पॉइंट आणि मसाई पठारावरून शुक्रवारी सायंकाळी नव्याच्या पौर्णिमेला सहा वाजण्याच्या सुमारास सूर्यास्त व चंद्रबिंब एकाच क्षितिजरेषेवर अवतरले. प्रत्येक पौर्णिमेला सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एका सरळ रेषेत येतात. चंद्र सूर्याच्या बरोबर विरुद्ध बाजूला असतो.
त्यामुळे जेव्हा सूर्य मावळतो, तेव्हा चंद्र उगवत असतो. मात्र, प्रत्येक वेळी सूर्यास्ताची आणि चंद्रोदयाची वेळ एकच नसते; कारण चंद्राची पृथ्वीभोवतीची थोडी कललेली कक्षा. चंद्राची कक्षा ही सूर्य आणि पृथ्वी यांना जोडणाऱ्या काल्पनिक रेषेच्या प्रतलास समांतर अशी नाही. मात्र, पृथ्वीभोवतीच्या एका फेरीत ही कक्षा दोन वेळा या काल्पनिक प्रतलास छेदते. त्या दोन्ही वेळांना ग्रहणे घडून येतात.
शुक्रवारी माघ पौर्णिमेला चंद्रग्रहण होते. यामुळे या दिवशी सूर्य, पृथ्वी आणि चंद्र अगदी सरळ रेषेत होते. पन्हाळ्यावर चंद्रोदयाची वेळ सूर्यास्ताच्या काही मिनिटांआधीच मिळाली. शुक्रवारी चंद्रोदयाची वेळ ५० मिनिटे उशिरा असल्यामुळे खगोल निरीक्षकांनी सूर्य आणि चंद्रबिंब दर्शनाचा एकत्र अनुभव घेतला.
पन्हाळ्याजवळील मसाई पठारावरून शुक्रवारी नव्याच्या पौर्णिमेला (माघ) एकाच वेळेत म्हणजे सहा वाजून १२ मिनिटांनी सूर्यास्ताबरोबरच पूर्ण चंद्र पाहण्याची संधी अवकाश निरीक्षकांनी साधली. कॅमेऱ्याच्या पॅनोरमा व्ह्यूने टिपलेला हा योग..