दुर्मीळ ग्रंथ, हस्तलिखितांचे होणार डिजिटायझेशन - उदय सामंत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2021 07:44 AM2021-06-07T07:44:50+5:302021-06-07T07:45:19+5:30
Uday Samant : सामंत म्हणाले, १८९८ साली स्थापन झालेले मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय हे शासनमान्य ‘जिल्हा-अ’ वर्ग ग्रंथालय म्हणून कार्यरत आहे. या ग्रंथसंग्रहालयामध्ये १ लाख ९३ हजार ४०० इतकी ग्रंथ संख्या आहे.
मुंबई : मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय आणि एशियाटिक सोसायटीकडे असलेल्या दुर्मीळ ग्रंथ व हस्तलिखितांचे डिजिटायझेशन करण्यासाठी या दोन्ही संस्थांना प्रत्येकी ५ कोटी रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतल्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्रीउदय सामंत यांनी सांगितले.
सामंत म्हणाले, १८९८ साली स्थापन झालेले मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय हे शासनमान्य ‘जिल्हा-अ’ वर्ग ग्रंथालय म्हणून कार्यरत आहे. या ग्रंथसंग्रहालयामध्ये १ लाख ९३ हजार ४०० इतकी ग्रंथ संख्या आहे. या ग्रंथालयामध्ये हस्तलिखित पोथ्या, विविध लेखकांचे साहित्य, हस्ताक्षरे यांचा संग्रह असून त्यांचे जतन, संरक्षण व संवर्धन करणे आवश्यक आहे.
१८०४ साली स्थापन झालेल्या मुंबई एशियाटिक सोसायटीला १९५० मध्ये राज्य शासनाने राज्य मध्यवर्ती ग्रंथालयाचे काम बघण्याचे निर्देश दिले होते. एशियाटिक सोसायटी ही संस्था २०० वर्षांपूर्वी स्थापन झालेली असल्यामुळे या संस्थेकडील दुर्मीळ ग्रंथांचे व हस्तलिखितांचे डिजिटायझेशन करण्यासाठी २०१५-१६ मध्ये पाच कोटींचे अनुदान मंजूर करण्यात आले होते.
याच कामाचा पुढील भाग संस्थेकडील दुर्मीळ ग्रंथ व हस्तलिखिते यांचे डिजिटायजेशन करण्यासाठी पाच कोटींचे अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असेही त्यांनी सांगितले.