दुर्मीळ कलासंग्रहाला ‘संरक्षण कवच’
By admin | Published: November 3, 2016 02:03 AM2016-11-03T02:03:56+5:302016-11-03T02:03:56+5:30
छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाने कलासंग्रहाचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी नवा प्रकल्प हाती घेतला आहे.
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाने कलासंग्रहाचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी नवा प्रकल्प हाती घेतला आहे. या वस्तुसंग्रहालयाने ‘कन्झर्व्हिंग द कलेक्शन : द केअरिंग पाथ आॅफ 5000 इयर्स आॅफ अवर आर्ट’ प्रकल्पांतर्गत ५० अतिशय दुर्मिळ आणि दर्जेदार कलाकृतींचे संवर्धन केले आहे. देशभरात अशा प्रकारे आपल्या संग्रहातील अतिशय दुर्मिळ कलाकृतींचे संवर्धन करण्यासाठी विशेष प्रकल्प राबविणारे छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय पहिलेच ठरले आहे.
पाच हजार वर्षांपूर्वीपासून असणाऱ्या दुर्मिळ कलाकृतींचे संवर्धन करण्याचा पहिला टप्पा नुकताच संग्रहालयाने पूर्ण केला आहे. त्यात दस्ताऐवज, मिनिएचर पेंटींग, कपड्यावरचे काम, धातूचे शिल्प, मातीचे शिल्प, हस्तिदंताच्या कलाकृती अशा वेगवेगळ््या शैलीतील कलाकृतींचा समावेश आहे. हा प्रकल्प १० टप्प्यांत विभागला असून पहिला टप्पा नुकताच पूर्ण करण्यात आला आहे.
या प्रकल्पातील पहिल्या टप्प्यात लेझर तंत्रज्ञानाद्वारे १५०० वर्षांपूर्वीचे धातू आणि दगडाचे संवर्धित करण्यात आलेले शिल्प मुख्य वैशिष्ट्य ठरले आहे. तसेच, या दुर्मिळ संग्रहात राजा रवी वर्मा यांनी साकारलेले चित्र, पेस्तोनजी बोमानजी आणि वासुदेव गायतोंडे यांचे चित्र, कापडावरील दख्खनी चित्र यांचा समावेश आहे. हा दुर्मिळ खजिना काही टप्प्यांनी कलारसिकांसाठी खुला करण्यात येणार असल्याची माहिती या प्रकल्पाचे मुख्य क्युरेटर अनुपम शहा यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.