कॅमेरा ट्रॅपिंगद्वारे होणार राज्यातील व्याघ्रगणना
By admin | Published: May 2, 2015 01:02 AM2015-05-02T01:02:06+5:302015-05-02T01:02:06+5:30
देशात आणि राज्यांत वाघांची संख्या किती? यासंदर्भात असलेला घोळ आता अद्ययावत कॅमेरा ट्रॅपिंग प्रणालीमुळे संपुष्टात आला आहे.
गणेश वासनिक, अमरावती
देशात आणि राज्यांत वाघांची संख्या किती? यासंदर्भात असलेला घोळ आता अद्ययावत कॅमेरा ट्रॅपिंग प्रणालीमुळे संपुष्टात आला आहे. या अत्याधुनिक प्रणालीमुळे वाघांची प्रगणना करण्यास मदत मिळत असल्याने वनविभागाने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. बुद्धपौर्णिमेला व्याघ्रगणना केली जाणार आहे.
व्याघ्र प्रकल्प, राष्ट्रीय उद्यान, अभयारण्य, पाणवठ्यावरील अस्तित्व व वनविभागाने विहित केलेल्या पद्धतीने २०१० ते २०१४ या दरम्यान व्याघ्र गणनेला सुरुवात करण्यात आली. नवीन पद्धतीनुसार कॅमेरा ट्रॅपिंग, नवतंत्रज्ञान प्रणाली वापरून देशभरातील वाघांची अचूक आकडेवारी निदर्शनास आली आहे. कॅमेरा ट्रॅपिंगमुळे वाघांसह अन्य वन्यप्राण्यांची गणना करणे सुकर झाले आहे. एका प्रकल्पातील वाघ दुसऱ्या व्याघ्र प्रकल्पाच्या सीमेत गेला तर ते या प्रणालीने सिद्ध करता येते. या अद्ययावत प्रणालीमुळे डेहरादून वन्यजीव संस्थेला सात वर्षांनी वाघांची संख्या निश्चित करणे शक्य झाले आहे. वाघांच्या पट्ट्यावरून वाघांची संख्या सहज स्पष्ट होऊ लागली आहे.
वनविभागाने हे नवे तंत्रज्ञान शस्त्र म्हणून वापरण्यास सुरुवात केली आहे. वाघांचे संरक्षण आणि शिकाऱ्यांवर नजर ठेवता येते. त्यामुळे वनविभागाने वनखंडानुसार महत्त्वाच्या जागी कॅमेरे बसविले आहेत. दर दोन ते तीन दिवसांनी तपासणी करून यात कैद झालेल्या वन्यप्राण्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवणे वनाधिकाऱ्यांना सुलभ झाले आहे. ताडोबा-अंधारी, पेंच, बोर, मेळघाट, सह्याद्री, नवेगाव बांध - नागझिरा या प्रमुख व्याघ्र प्रकल्पांमध्ये या प्रणालीचा उपयोग होऊ लागला आहे.