सासवडनगरीत दर्शनासाठी रांगा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2017 05:23 AM2017-06-22T05:23:50+5:302017-06-22T05:23:50+5:30
संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा सोपानकाकांच्या सासवड नगरीत मुक्कामी असून बुधवारी दिवसभर दर्शनासाठी पंचक्रोशीतील भाविकांनी रांगा लावल्या होत्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
सासवड (पुणे) : संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा सोपानकाकांच्या सासवड नगरीत मुक्कामी असून बुधवारी दिवसभर दर्शनासाठी पंचक्रोशीतील भाविकांनी रांगा लावल्या होत्या. सोपानकाकांच्या पालखीला निरोप दिल्यानंतर वारकऱ्यांनी टाळ-मृदंगाच्या तालात अभंगात तल्लीन झाल्याचे चित्र पहायला मिळत होते.
पुरंदरच्या ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने भाविकांनी हजेरी लावून दर्शनाचा लाभ घेतला. दरम्यान, सासवडकरांनी मंगळवारी (दि.२०) मध्यरात्रीपर्यंत रांगा लावून दर्शन घेतले. बुधवारी पहाटे पालखीच्या ठिकाणी सासवड नगरपालिकेच्या वतीने महापूजा करण्यात आली.
सोपानदेव पालखीचे प्रस्थान
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचे धाकटे बंधू संत सोपानदेव यांच्या पालखीचे बुधवारी सासवडहून वैभवशाली प्रस्थान झाले. पालखीचा आज पांगारे गावी मुक्काम आहे. संत ज्ञानदेव माऊलींचा पालखी सोहळा सासवड मुक्कामी आहे. या सोहळ्यातील हजारो वारकऱ्यांनी प्रस्थान सोहळ्याला हजेरी लावली. दुपारी अडीचच्या सुमारास जेजुरी नाक्यावरून पालखी सोहळा मार्गस्थ झाला. त्यानंतर काही वेळाने संत चांगा वटेश्वर पालखी सोहळ्याचेही प्रस्थान झाले.
यवत (पुणे) : संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास यवत मुक्कामी श्री काळभैरवनाथ मंदिरात विसावला. यवत ग्रामस्थांनी वेशीवर अभंग गात पालखी सोहळ्याचे स्वागत केले. त्यानंतर परंपरेप्रमाणे वारकऱ्यांना चुलीवरील भाकरी व पिठाल्याचे भोजन देण्यात आले. ग्रामस्थांनी तब्बल एक लाख भाकरी व एक हजार किलो बेसनचे पिठले बनविले होते. पिठल-भाकरीच्या भोजनाची यवतमधील परंपरा अनेक वर्षे जुनी आहे.
पांडुरंगाच्या भेटीसाठी आतूर झालेल्या पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांनी लोणी काळभोर येथील मुक्काम आटोपून सकाळी प्रस्थान ठेवले. पंढरीच्या वाटेवर लोणी ते यवत हा जवळपास २८ किलोमीटरचा मार्ग सर्वात मोठा टप्पा आहे. ‘ज्ञानोबा - तुकाराम’चा जयघोष करीत वारकऱ्यांनी हा टप्पा सहजपणे पार केला. सोहळा गुरुवारी सकाळी यवतहून प्रस्थान ठेवून वरवंड येथे मुक्काम करणार आहे.