पदांसाठी राष्ट्रवादीत रस्सीखेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2017 01:18 AM2017-03-01T01:18:35+5:302017-03-01T01:18:35+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसमधील ज्येष्ठ नगरसेवकांमध्ये शहराध्यक्ष तसेच पालिकेतील विरोधी पक्षनेतेपदासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे.
पुणे : सत्तेतून पायउतार झाल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमधील ज्येष्ठ नगरसेवकांमध्ये शहराध्यक्ष तसेच पालिकेतील विरोधी पक्षनेतेपदासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. या पदांसाठी ज्येष्ठ महिला नगरसेवकही इच्छुक असून त्यांनीही मोर्चेबांधणी सुरू केली आहे. महापौर प्रशांत जगताप हेही इच्छुकांच्या स्पर्धेत आहेत.
कमळाच्या लाटेतही राष्ट्रवादी काँग्रेसने आपले घड्याळ कसेबसे तगवले आहे. पक्षाचे एकूण ४० नगरसेवक निवडून आले असून त्यात ज्येष्ठ नगरसेवकांची संख्या जास्त आहे. पक्षाच्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून शहराध्यक्ष खासदार वंदना चव्हाण यांनी राजीनामा दिल्यामुळे ते पद रिक्त झाले आहे. पालिका सभागृहात सत्ताधारी पक्षाच्या खालोखाल सर्वांत जास्त नगरसेवक असणारा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसच आहे. त्यामुळे त्यांना विरोधी पक्षनेतेपद मिळणार आहे.
या दोन पदांसाठी आता पक्षात रस्सीखेच सुरू झाली आहे. चंचला कोद्रे, वैशाली बनकर, दत्तात्रय धनकवडे व आता प्रशांत जगताप असे चार माजी महापौर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांमध्ये आहेत. याशिवाय माजी उपमहापौर दीपक मानकर, स्थायी समितीच्या माजी अध्यक्ष अश्विनी कदम, चेतन तुपे व अन्य काहीजण अनुभवी नगरसेवक आहेत. या सर्वांनाच आता सत्ता नसल्यामुळे एखादे तरी सत्तापद हवे आहे. मात्र पदे फक्त दोनच असल्यामुळे त्यांच्यात स्पर्धा सुरू झाली आहे. त्यादृष्टीने त्यांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.
महापौर जगताप यांनी याची सुरूवात जाहीरपणे करून दिली आहे. पक्षाच्या पराभवाविषयी बोलतानाच त्यांनी यापुढेही पक्षाने कोणतीही जबाबदारी दिली तरीही ती स्वीकारण्यास तयार असल्याचे म्हटले आहे.
शहराध्यक्षपद कटकटीचे व भरपूर वेळ द्यावा लागणारे आहे. त्यामुळे बहुसंख्य इच्छुकांचा डोळा विरोधी पक्षनेतेपदावर आहे. या पदाला पालिकेचे वाहन, स्वतंत्र दालन व कर्मचारीही असल्यामुळे हे पद मिळावे, यासाठी त्यांचा प्रयत्न आहे.
(प्रतिनिधी)
>नेते, कार्यक्रमकर्त्यांना प्रतीक्षा पवारांची
पक्षाचे नेते अजित पवार निवडणुक निकालापासून पुण्यात आलेलेच नाहीत. ते परगावी गेले असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे पदांसाठी इच्छुकांनी नव्याने निवडून आलेल्या नगरसेवकांचा गट बांधण्यास सुरूवात केली असल्याची माहिती मिळाली. जास्त नगरसेवक मागे असतील त्यांचा पदांसाठी विचार होण्याची शक्यता आहे. अंतिम निर्णय पवारच घेणार असल्याने आता सर्वजण त्यांच्या येण्याची वाट पहात आहेत.