पुण्याच्या पोलिस आयुक्तपदी रश्मी शुक्लांची नियुक्ती
By admin | Published: March 31, 2016 12:48 PM2016-03-31T12:48:06+5:302016-03-31T12:54:46+5:30
राज्य गुप्तवार्ता विभागाच्या पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांची पुण्याच्या पोलिस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. ३१ - राज्य गुप्तवार्ता विभागाच्या पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांची पुण्याच्या पोलिस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून शुक्ला यांच्या नावाचीच चर्चा सुरू होती, अखेर आता या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला असून शुक्ला यांच्या नियुक्तीबाबतचे आदेश आज गृह विभागाने काढले आहेत. सध्याचे पोलिस आयुक्त तथा पोलिस महासंचालक के.के. पाठक हे आजच (३१ मार्च) निवृत्त होत आहेत.
रश्मी शुक्ला या सन १९८८ च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी असून यापूर्वी त्यांनी राज्य गुप्तवार्ता विभागात सहआयुक्त तसेच आयुक्तपद भूषविले आहे. मुंबई पोलिस दलातही त्यांनी वेगवेगळया पदांवर कर्तव्य बजावले असून एक शिस्तप्रिय महिला अधिकारी म्हणून त्यांची पोलिस दलामध्ये ओळख आहे.
पुण्याच्या पोलिस आयुक्त होण्याचा मान मिळवणार्या रश्मी शुक्ला या दुसर्या महिला पोलिस अधिकारी आहेत. यापूर्वी पोलिस महासंचालक मीरा बोरवणकर यांनी पुण्याचे पोलिस आयुक्तपद भूषवले. गेल्या दोन महिन्यात पुण्याच्या पोलिस आयुक्तपदी कोण विराजमान होणार याबाबत तर्क-वितर्क काढले जात होते. शुक्ला यांची नियुक्ती निश्चित मानली जात होती. मात्र, इतर अधिकार्यांची नावे देखील चर्चेत होती. अखेर शुक्ला यांच्या नियुक्तीमुळे अनेक चर्चांना पुर्णविराम मिळाला आहे. आयुक्त रश्मी शुक्ला यांचे भूगर्भशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण झाले आहे.